Indian Air Strike : दहशतवाद्यांचे मृतदेह आम्ही पाहिले, बालाकोटमधील काही स्थानिकांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 04:33 PM2019-03-02T16:33:23+5:302019-03-02T16:52:58+5:30
भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पहाटे जबरदस्त एअरस्ट्राइक करून बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केले होते.
इस्लामाबाद - भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पहाटे जबरदस्त एअरस्ट्राइक करून बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केले होते. मात्र या कारवाईत नेमकी किती हानी झाली हे समोर येत नव्हते. दरम्यान, भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईत जैशच्या तळावरील चार इमारती नष्ट झाल्याची माहिती समोर आली होता. भारतीय हवाईदलाच्या एअर स्ट्राइकनंतर घटनास्थळावरून सुमारे 35 दहशतवाद्यांचे मृतदेह अॅम्ब्युलन्समधून बाहेर आणण्यात आले. असा दावा काही प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने करण्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्त फर्स्टपोस्टने दिले आहे.
भारतीय हवाई दलाच्या कारवाईनंतर बालाकोट येथील एअरस्ट्राइकबाबत दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात होती. तसेच घटनास्थळावर ठरावीक प्रसारमाध्यमांना नेऊन तिथे काहीच झाले नाही, असाही दावा करण्यात येत होता. मात्र एअर स्ट्राइकवेळी त्या परिसरात असलेल्यांकडून वेगळीच माहिती समोर येत असून, त्यातून पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडकीस येत आहे.
भारतीय हवाईदलाने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर काही वेळाने घटनास्थळावरून सुमारे 35 दहशतवाद्यांचे मृतदेह अॅम्ब्युलन्समधून बाहेर नेण्यात आले. या कारवाईत ठार झालेल्यांमध्ये पाकिस्तानी सैन्यात काम केलेल्यांचाही समावेश आहे, असा दावा काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींनी ही माहिती ओळख उघड न करण्याच्या अटीवर दिली आहे.
एअर स्ट्राइकनंतर काही वेळातच स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र पाकिस्तानी सैन्याकडून तात्काळ हा परिसर बंद करण्यात आला. तसेच पोलिसांनाही घटनास्थळावर जाण्यास मनाई करण्यात आली. एअर स्ट्राइक झालेल्या ठिकाणची माहिती बाहेर पोहोचू नये म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडचे मोबाइलसुद्ध जप्त करण्यात आले होते, असा दावाही काही स्थानिक व्यक्तींनी केला.