दलाई लामांना भेटणे हा आम्ही अपमान मानू, चीनचा इतर देशांना इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:50 AM2017-10-22T00:50:01+5:302017-10-22T00:50:33+5:30
तिबेटी समाजाचे धर्मगुरू दलाई लामा हे चीनच्या मुख्य भूमीपासून तिबेट वेगळे काढू पाहत असल्याने आमच्या दृष्टीने ते ‘फुटीरवादी’ आहेत.
बीजिंग : तिबेटी समाजाचे धर्मगुरू दलाई लामा हे चीनच्या मुख्य भूमीपासून तिबेट वेगळे काढू पाहत असल्याने आमच्या दृष्टीने ते ‘फुटीरवादी’ आहेत. त्यामुळे कोणत्याही देशाने त्यांचा पाहुणचार करणे किंवा त्यांना भेटणे हा आम्ही आमचा अपमान समजू, असा इशारा चीनने इतर देशांना दिला आहे.
सध्या येथे सुरू असलेल्या चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या १९ व्या राष्ट्रीय काँग्रेसच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना चीन सरकारचे एक कार्यकारी उपमंत्री झांग यीजोंग म्हणाले की, परदेशांनी चीनशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करताना तिबेट हा चीनचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य केले असल्याने दलाई लामांशी संबंध ठेवणे म्हणजे त्या वचनाचा भंग करणे आहे.
दलाई लामा हे तिबेटींचे धर्मगुरू आहेत म्हणून आम्ही त्यांच्याशी संबंध ठेवतो, हे म्हणणे चीनला मान्य नाही. कारण दलाई लामा हे आता धर्मगुरूच्या पेहरावात वावरणारे राजकीय नेते झाले आहेत. दलाई लामा सन १९५९ मध्ये आपल्या मातृभूमीशी गद्दारी करून अन्य
देशात पळून गेले आणि त्यांनी तेथे तिबेटचे विजनवासातील कथित सरकार स्थापन केले आहे. तिबेट चीनपासून वेगळे करणे हा एकच कार्यक्रम डोळ्यापुढे ठेवून दलाई लामांचे हे विजनवासी सरकार गेली कित्येक दशके काम करीत आले
आहे. (वृत्तसंस्था)