...तरीही आम्ही तुमच्या पुढेच, इस्त्रोच्या यशावर चीनची खोचक प्रतिक्रिया
By admin | Published: February 16, 2017 02:31 PM2017-02-16T14:31:47+5:302017-02-16T14:31:47+5:30
चीननं भारताच्या यशावर स्तुती करत उपरोधिक टीकाही केली आहे.
ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 16 - भारतीय अंतराळ संशोधन संघटने(इस्रो)नं एकाच उड्डाणात तब्बल १०४ उपग्रहांचे अंतराळात विविध कक्षांमध्ये यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर जगभरातून भारतावर स्तुतिसुमनांचा वर्षाव होत आहे. मात्र नेहमीप्रमाणेच चीननं भारताच्या यशावर स्तुती करत उपरोधिक टीकाही केली आहे. भारताच्या यशातून जगातील इतर देशांनी शिकलं पाहिजे. भारतीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. मर्यादित आर्थिक बळाच्या जोरावर भारतानं घेतलेली गुरुडझेप खरंच वाखाणण्याजोगी आहे. मात्र तरीही चीन भारताच्या पुढे आहे, असा लेख चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये छापण्यात आला आहे.
अवकाश तंत्रज्ञानात भारत हा चीन आणि अमेरिकेच्या मागे आहे. व्यापक अवकाश संशोधनासाठी भारताकडे रॉकेटचं पाठबळ नाही. तसेच भारत अजूनही स्वतःचं स्पेस स्टेशन उभारू शकला नसल्याचंही या लेखात म्हटलं आहे. जगातील सर्वात जास्त गरीब लोक हे भारतात राहतात. विकासाच्या बाबतीतही भारत फार मागे आहेत, असं नमूद करत या लेखातून उपरोधिक टीका करण्यात आली आहे.