आम्हाला नोक-या देणारे तरुण तयार करायचे आहेत - नरेंद्र मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 04:49 PM2017-11-13T16:49:00+5:302017-11-13T17:06:36+5:30
आम्हाला भारताला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनवायचे असून, नोक-या देणारे तरुण तयार करायचे आहेत.
मनिला - आम्हाला भारताला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनवायचे असून, नोक-या देणारे तरुण तयार करायचे आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी ’एशियान’ शिखर परिषदेत बोलताना सांगितले. भारतीय लोकसंख्येचा मोठा वर्ग बँक सुविधेपासून वंचित होता. जन धन योजनेमुळे ते चित्र बदलले. लाखो लोकांच्या आयुष्यात परिवर्तन झाले असे मोदींनी सांगितले. मिनिमम गर्व्हमेंट आणि मॅक्सिमम गव्हर्नन्सवर आमचा भर आहे. मागच्या तीन वर्षात कालबाहय झालेले 1200 कायदे रद्द केले.
कंपनी सुरु करण्याची प्रक्रिया आम्ही अधिक सोपी केली. अनेक परवानग्याही सुलभतेने मिळतील याकडे लक्ष दिले असे मोदींनी सांगितले. डिजिटल व्यवहार मोठया प्रमाणात वाढले असून, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. भारतात परिवर्तन घडवण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरु आहेत. सोपे, परिणामकारक आणि पारदर्शक प्रशासनासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहोत असे मोदींनी सांगितले.
’एशियान’ शिखर संमेलानासाठी फिलिपिन्समध्ये आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. या भेटीमध्ये मोदी आणि ट्रम्प यांच्यात आशियाई देशांचे भविष्य आणि अमेरिकेशी असलेल्या संबंधांवर चर्चा झाली. भारत आणि अमेरिका मिळून संपूर्ण जगाचे भविष्य बदलू शकतात, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. तसेच भारताच्या केलेल्या कौतुकासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले.
आशियाई शिखर परिषदेतील भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील चर्चा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. गेल्या सहा महिन्यांमधील मोदी आणि ट्रम्प यांच्यामधील ही दुसरी बैठक आहे. या बैठकीमधून ट्रम्प यांनी भारत हा अमेरिकेसाठी चीनपेक्षा कमी महत्त्वपूर्ण नसल्याचे दाखवून दिले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध सातत्याने सुधारले आहेत. विशेषकरून चीनच्या वन बेल्ट वन रोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रत्युत्तर म्हणून भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका यांच्यातील युतीमधून त्याचे संकेत मिळत आहेत.