इराणच्या ५२ ठिकाणांवर हल्ले करू -ट्रम्प
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 04:46 AM2020-01-06T04:46:17+5:302020-01-08T12:19:23+5:30
इराणचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणने जर प्रत्युत्तरात काही कारवाई केली, तर त्यांच्या ५२ ठिकाणांवर हल्ले करण्यात येतील,
वॉशिंग्टन : इराणचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणने जर प्रत्युत्तरात काही कारवाई केली, तर त्यांच्या ५२ ठिकाणांवर हल्ले करण्यात येतील, अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.
अमेरिकी ड्रोन हल्ल्यात बगदादमध्ये जनरल सुलेमानी (६२) मारले गेले. त्याचा बदला घेण्याचा संकल्प इराणने केला आहे. यामुळे या दोन देशांत तणाव वाढला आहे. ट्रम्प यांनी असा इशारा दिला आहे की, जर इराणने अमेरिकी सैन्य कर्मचारी आणि संपत्तीवर हल्ला केला, तर इराणमधील ५२ ठिकाणांना लक्ष्य करण्यात येईल. यातील काही स्थळ इराण आणि इराणी संस्कृतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत.
ट्रम्प यांनी टष्ट्वीट केले आहे की, त्यांनी आमच्या दूतावासावर हल्ला केला आहे आणि अन्य ठिकाणांवर हल्ला करण्याची तयारी करीत आहेत; पण त्यांनी असा प्रयत्न केल्यास त्यांच्या ५२ ठिकाणांवर हल्ला करण्यात येईल.
काही वर्षांपूर्वी इराणने ५२ अमेरिकींना ओलिस ठेवले होते. त्याचे प्रतीक म्हणून ही ठिकाणे निश्चित केली आहेत. इराणवरील हा हल्ला आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असेल अशी धमकीही दिली आहे.
>अमेरिकेकडे लढाईचे साहस नाही : इराण
अमेरिकेकडे लढाई सुरू करण्याचे साहस नाही, असे इराणने म्हटले आहे. इराणची सरकारी संवाद समिती आयआयएनएचे मेजर जनरल अब्दुल रहमान मौसावी यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, त्यांनी ५२ ठिकाणी हल्ले करण्याची जी धमकी दिली आहे ती लढाई सुरू करण्याचे साहस त्यांच्यात आहे, असे आम्हाला वाटत नाही.
>सुलेमानी यांना श्रद्धांजली
कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तेहरानमध्ये मोठ्या संख्येने लोक एकत्र आले होते. काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले हजारो लोक शोकसभेत सहभागी झाले होते. १९८०-८८ च्या इराण-इराक युद्धाचे नायक म्हणून लोक सुलेमानी यांच्याकडे पाहतात. सुलेमानी यांचे पार्थिव रविवारी अहवाज विमानतळावर पोहोचले. त्यानंतर त्यांचे पार्थिव तेहरानला नेण्यात येईल. मंगळवारी त्यांच्या गावी करमनमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अमेरिका-केन्याच्या सैन्य ठिकाणांवर हल्ला
सोमालियाच्या अल-शबाब समूहाच्या सदस्यांनी रविवारी केन्याच्या किनारी भागातील लामू क्षेत्रात अमेरिका-केन्याच्या सैन्य ठिकाणांवर हल्ला केला. या सैन्य तळांचा उपयोग अमेरिका आणि केन्याचे सैन्य करते. या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असे लामूचे कमिश्नर इरुंगू मेकारिया यांनी म्हटले आहे.