कुठल्याही किंमतीत आम्ही प्रिगोझिनच्या मृत्यूचा बदला घेऊ; पुतिन यांना थेट धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 11:12 PM2023-08-24T23:12:38+5:302023-08-24T23:12:58+5:30
प्रिगोझिनच्या मृत्यूनंतर, वॅग्नर ग्रुपने एक धमकीचा व्हिडिओ जारी केला.
मॉस्को- विमान अपघातात प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांच्या मृत्यूच्या घटनेने वॅग्नर ग्रुपचे सैनिक संतापले आहेत. प्रिगोझिन यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सत्तेतून उखडून टाकण्यासाठी प्लॅन बी तयार केला होता. यामुळे त्यांची हत्या करण्यात आली आहे. एका खासगी विमानाच्या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आले. पण वॅग्नरच्या सैनिकांनी पुतिन यांना प्रिगोझिनच्या मृत्यूचा बदला घेण्याचा इशारा दिला आहे. प्रिगोझिनच्या मृत्यूचा बदला आपण कोणत्याही किंमतीत घेऊ असा इशारा त्यांनी पुतिन यांना दिला आहे. तर पुतिन यांनी प्रथमच प्रिगोझिनच्या मृत्यूवर मौन सोडले आहे.
प्रिगोझिनच्या मृत्यूनंतर, वॅग्नर ग्रुपने एक धमकीचा व्हिडिओ जारी केला. यामध्ये सैनिकांनी आपल्या प्रमुखाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मॉस्कोच्या दिशेने आणखी एक मोर्चा काढण्याचे संकेत दिले आहेत. वॅग्नरमध्ये काय होणार, याबाबत बरीच चर्चा ग्रुपच्या सदस्यांमध्ये झाली आहे, यात सैनिक बोलत होते की, आम्ही एक गोष्ट सांगतो, आम्ही सुरू करत आहोत, फक्त आमची वाट पहा.' वॅग्नर सैनिकाने टेलिग्राम चॅनेलवर दुसर्या बंडाचा इशारा दिला. पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'वॅग्नरचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांच्या मृत्यूबद्दल अफवा आहेत. पुतिन यांच्या नेतृत्वाखालील क्रेमलिन अधिकार्यांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा आम्हाला संशय आहे. प्रिगोझिनच्या मृत्यूची माहिती पुष्टी झाल्यास, आम्ही मॉस्कोमध्ये न्यायासाठी दुसरा मोर्चा काढू त्यामुळे तो जिवंत असणे हेच तुमच्यासाठी चांगले आहे असं व्हिडिओत आहे.
पुतिन म्हणाले, प्रतिभावान उद्योगपती
दुसरीकडे, पुतिन यांनी पहिल्यांदाच प्रिगोझिनच्या मृत्यूवर मौन सोडले आहे. पुतिन यांनी वॅग्नर समूहाचे प्रमुख असलेल्या प्रिगोझिनचे "उत्कृष्ट उद्योगपती" म्हणून कौतुक केले आहे. तसेच दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या. पुतिन यांनी प्रिगोझिनच्या मृत्यूबद्दल २४ तासांनी मौन तोडले, ते म्हणाले की मी प्रिगोझिनला १९९० च्या दशकापासून ओळखत होते. विमान अपघाताच्या अधिकृत तपासाच्या निकालाची मी वाट पाहतोय. त्याच्या तपासात थोडा वेळ लागेल असेही त्यांनी सांगितले. प्रिगोझिनने जूनमध्ये रशियात बंड सुरू केलं तेव्हापासून त्याच्या आयुष्याविषयी चिंता व्यक्त करण्यात येत होती.
पुतिन यांच्या आदेशानुसार हत्या
संशोधक इव्हाना स्ट्रॅडनर यांनी सांगितले की, रशियाची संपूर्ण माहिती प्रणाली ही घटना आपल्या बाजूने फिरवण्यासाठी वेगाने काम करेल. पुतिन विश्वासघात कधीही माफ करत नाहीत आणि विसरत नाहीत. म्हणूनच प्रिगोझिनच्या या स्थितीची अपेक्षा होती. विशेष म्हणजे, प्रिगोझिनच्या अयशस्वी उठावाच्या दोन महिन्यांनंतर त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. ६२ वर्षीय प्रिगोझिन खाजगी जेटमध्ये असताना तो आगीच्या गोळ्यात रुपांतर होतो. पुतिन यांना आव्हान देणाऱ्या प्रिगोझिन याची राष्ट्राध्यक्षांच्या आदेशावरून हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.