'आम्ही हमासचे सर्व उद्वस्त करु, जागा रिकामी करू', नेतान्याहू यांनी रविवारी पुन्हा इशारा दिला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 10:10 AM2023-10-08T10:10:25+5:302023-10-08T10:13:06+5:30
इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासच्या दहशतवाद्यांना इशारा दिला आहे.
इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात शनिवारी सुरू झालेल्या युद्धानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी हमासच्या दहशतवाद्यांना इशारा दिला. 'आम्ही त्यांचे सर्व तळ भंगारात बदलू. शनिवारी सकाळी हमासचे दहशतवादी इस्रायलमध्ये वेगवेगळ्या मार्गाने घुसले आणि निवासी भागात हल्ले केले. यावेळी गाझा पट्टीतून २० मिनिटांत इस्रायलवर ५ हजार रॉकेट डागण्यात आले. यानंतर इस्रायल सरकारने हमासविरुद्ध युद्ध घोषित केले.
हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने उपसली ‘तलवार’; मोठी किंमत चुकवावी लागेल; PM नेतान्याहू यांचा इशारा
पंतप्रधान नेतन्याहू यांनी हमासच्या अतिरेक्यांना इस्रायली सैन्याच्या कारवाईविरुद्ध इशारा देताना सांगितले की 'गाझा शहरातील त्यांची लपण्याची ठिकाणे "भंगारात बदलली जातील." त्यांनी गाझामधील रहिवाशांना इस्रायली सैन्याच्या कारवाईबाबत इशारा दिला आणि गाजा येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितले.
नेतान्याहू यांनी ट्विट केले. आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "हमास तैनात असलेल्या आणि लपलेल्या सर्व ठिकाणांना आम्ही उद्वस्त करु. मी गाझातील रहिवाशांना ती ठिकाणे सोडण्यास सांगू इच्छितो कारण आम्ही सर्वत्र सक्तीने कारवाई करू." नेतन्याहूचा इशारा त्यांनी इस्रायलमध्ये "युद्ध राज्य" घोषित केल्यानंतर एक दिवस आला आहे.
शनिवारी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नेतन्याहू यांनी वक्तव्य केले. नेतन्याहू म्हणाले, "आम्ही युद्धात आहोत, ऑपरेशनमध्ये नाही. हमासने इस्रायल राज्य आणि तेथील नागरिकांवर प्राणघातक हल्ला सुरू केला आहे. घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांच्या वसाहती नष्ट करण्याचे आदेश मी आधी दिले होते." 'शत्रूला अशी किंमत मोजावी लागेल ज्याचा त्यांनी कधी विचार केला नसेल.'
गाझा पट्टीतून हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या अचानक हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये किमान ३०० लोकांचा मृत्यू झाला आहे तर १६०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दक्षिण इस्रायलच्या अनेक भागात रॉकेटचे सायरन वाजत असल्याचे इस्रायली माध्यमांनी सांगितले. गाझा पट्टीजवळील भागात जसे की सेडरॉट, किबुट्झ नीर आम, याड मोर्दचाई आणि नेटिव्ह हसरा यांनी हवाई हल्ल्यांचे इशारे ऐकले. याव्यतिरिक्त, हमासच्या हल्ल्यांना प्रतिसाद म्हणून इस्रायली संरक्षण दलांनी सुरू केलेल्या ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्समध्ये गाझा आणि वेस्ट बँकमध्ये २३० हून अधिक लोक मारले गेले आहेत.
त्याचबरोबर पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिलेल्या वक्तव्यावर हमासकडूनही प्रतिक्रिया आली आहे. हमासच्या सशस्त्र विंगच्या प्रवक्त्याने रविवारी मध्यरात्रीनंतर एक विधान जारी केले की, इस्त्रायली शहरांवर शनिवारी झालेल्या हल्ल्यांमध्ये हमासने पकडलेल्या इस्रायलींची एकूण संख्या डझनभरांपेक्षा "अनेक पटीने जास्त" आहे. ओलीस घेतलेले लोक गाझा पट्टीच्या सर्व भागात पसरले होते, असंही त्यांनी म्हटले आहे.