भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे देशाची ५८% संपत्ती
By admin | Published: January 17, 2017 05:40 AM2017-01-17T05:40:21+5:302017-01-17T05:40:21+5:30
लोकसंख्येच्या एक टक्का असलेल्या श्रीमंतांकडे देशाच्या एकूण संपत्तीपैकी ५८ टक्के संपत्ती आहे
डावोस : भारतातील गरीब-श्रीमंतांतील दरी वाढत असून लोकसंख्येच्या एक टक्का असलेल्या श्रीमंतांकडे देशाच्या एकूण संपत्तीपैकी ५८ टक्के संपत्ती आहे. गरिबीविरुद्ध लढणारी संस्था आॅक्सफॅमने जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीपूर्वी जारी केलेल्या एका अभ्यासात ही माहिती समोर आली. भारतातील ५७ अब्जाधीशांकडे २१६ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. तळाच्या ७0 टक्के लोकांकडे एवढीच संपत्ती आहे. अहवालात म्हटले आहे की, भारतातील ८४ अब्जाधीशांकडे २४८ अब्ज डॉलरची संपत्ती आहे.
१९.३ अब्ज डॉलरसह मुकेश अंबानी सर्वोच्च स्थानी आहे. त्याखालोखाल दिलिप सिंघवी यांच्याकडे १६.७ अब्ज डॉलर, अझिम प्रेमजी यांच्याकडे १५ अब्ज डॉलर संपत्ती आहे. भारताची एकूण संपत्ती ३.१ लाख कोटी डॉलर आहे. जगाची एकूण संपत्ती २५५.७ लाख कोटी डॉलर आहे. त्यापैकी ६.५ लाख डॉलरची संपत्ती श्रीमंतांच्या ताब्यात आहे. (वृत्तसंस्था)
>आठ लोकांकडे अर्ध्या जगाची संपत्ती
जगातील ८ अब्जाधीशांइतकी संपत्ती तळाच्या ५0 % लोेकांकडे आहे. ३.६ अब्ज लोकांएवढी संपत्ती ८ श्रीमंतांकडे आहे. आॅक्सफॅमचे कार्यकारी संचालक बिनी बायन्यीमा यांनी सांगितले की, जगातील प्रत्येक १0 व्यक्तींपैकी १ व्यक्ती २ डॉलरवर दिवस काढतात. स्वीस बँक ‘क्रेडी स्यूसी’ने दिलेल्या आकडेवारीनुसार हा अहवाल आॅक्सफॅमने जारी केला आहे.