इसिसकडील शस्त्रे अमेरिका, चीनची
By admin | Published: October 6, 2014 10:58 PM2014-10-06T22:58:00+5:302014-10-06T22:58:00+5:30
जिहादी संघटना इसिस (इस्लामिक स्टेट इन इराक अँड सिरिया) ने इराक व सिरियात लढण्यासाठी वापरलेली शस्त्रास्त्रे अमेरिका व चीनने पुरविलेल्या शस्त्रास्त्रांपैकी असल्याचे आता स्पष्ट झाले
न्यूयॉर्क : जिहादी संघटना इसिस (इस्लामिक स्टेट इन इराक अँड सिरिया) ने इराक व सिरियात लढण्यासाठी वापरलेली शस्त्रास्त्रे अमेरिका व चीनने पुरविलेल्या शस्त्रास्त्रांपैकी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हे देश इसिसच्या विरोधात लढणाऱ्या आघाडीतील प्रमुख देश आहेत. शस्त्रास्त्रांचा शोध घेणाऱ्या खाजगी संघटनेने हा दावा केला आहे.
सिरिया व इराकमध्ये सापडलेली शस्त्रास्त्रे व काडतुसे हा या प्रकरणी गोळा करण्यात आलेल्या पुराव्याचा एक भाग असून, दुसऱ्या देशात हस्तक्षेप करणाऱ्या तसेच जागतिक धोरण आखणाऱ्या लोकांना हा निर्वाणीचा इशारा आहे.
सिरिया व इराकमधील सरकार स्थिर करण्यासाठी पाठविलेली शस्त्रास्त्रे व दारुगोळा त्या सरकारकडून जिहादी संघटनांकडे सोपविण्यात आला व इस्लामिक स्टेट अस्तित्वात येण्यास एकापरीने मदतच झाली, तसेच जिहादी संघटनांचे बळ या शस्त्रास्त्रांनी वाढविले. या शस्त्रास्त्रातील रायफलची काडतुसे अमेरिकेची असून, या काडतुसांनी इस्लामिक स्टेटच्या उदयात प्रमुख भूमिका बजावली आहे. कॉन्फ्लिक्ट आर्मामेंट रिसर्च या संघटनेचे जेम्स बीव्हन यांनी ही माहिती दिली. ही संघटना इसिसने वापरलेली शस्त्रास्त्रे गोळा करत असून त्याचे विश्लेषण करत आहे.
इसिसला मिळालेली शस्त्रे सिरियातील सरकारविरोधी बंडखोरांनी पुरविली असे विश्लेषकांचे मत आहे. सिरियातील बंडखोरांना परदेशाकडून मिळालेली शस्त्रास्त्रे, जिंकलेल्या भागात मिळालेली शस्त्रास्त्रे, तसेच इराक व सिरियाच्या लष्करातील भ्रष्ट सदस्यांकडून मिळालेली शस्त्रास्त्रे गोळा करून इसिसने लढा दिला आहे. कॉन्फ्लिक्टने जमा केलेल्या माहितीनुसार १७३० काडतुसे अमेरिकन असून, ती रायफली व मशीनगनमध्ये वापरता येतात. कॉन्फ्लिक्टला युरोपियन युनियनकडून निधी मिळत असून, इसिस बंडखोरांना शस्त्रास्त्रे कशी व कोठून मिळाली याचा शोध घेण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)