लग्नातली भेट अजून सांभाळली! बायडेन आता कधीच चालवू शकणार नाहीत Corvette कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 12:15 PM2021-01-21T12:15:35+5:302021-01-21T12:17:54+5:30
Joe Biden News: जो बायडेन यांनी 20 जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. आता त्यांना त्यांच्या सर्व कार, वाहने अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिस एजन्सीकडे सोपवावी लागणार आहेत.
अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. सर्वात मोठा त्याग म्हणजे खासगी आयुष्याचा. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष पायउतार झाल्यानंतरही पुढील आयुष्यात कधीही एकटा फिरू शकत नाही. महत्वाचे म्हणजे अमेरिकेची भक्कम सुरक्षा यंत्रणा त्यांना तसे फिरूच देणार नाही. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनादेखील असाच त्याग करावा लागणार आहे.
जो बायडेन यांनी 20 जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. आता त्यांना त्यांच्या सर्व कार, वाहने अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिस एजन्सीकडे सोपवावी लागणार आहेत. यामध्ये त्यांना लग्नात भेट मिळालेली, सर्वात आवडती शेवरोले कंपनीची Chevy Corvette convertible Stingray (चेवी कॉर्वेट कन्वर्टिबल स्टिंग्रे) कारची चावीदेखील सिक्रेट सर्व्हिसला द्यावी लागणार आहे. महत्वाचे म्हणजे ही कार 1967 मध्ये बनविण्यात आली होती. ती त्यांनी तेव्हापासून आजतागायत चकचकीत ठेवली आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी अभेद्य कार दिलेली असते. राष्ट्राध्यक्ष असेपर्यंत ते त्याच कारमधून फिरतात. डोनाल्ड ट्रम्प गुजरात दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांच्या कारची वैशिष्ट्य़े आपण पाहिलीच. आता ट्रम्पही एकट्याने कुठेही फिरू शकत नाहीत. त्यांच्यासाठीही तेलढीच तगडी सुरक्षा दिली जाणार आहे.
सिक्रेट सर्व्हिस आपल्या कमांडरला कोणत्याही अन्य़ गाडीने कधीच फिरू देत नाहीत. जो बायडेन त्यांचा कार्यकाळ संपला तरीही ते त्यांची आवडीची कार्वेट कार चालवू शकणार नाहीत. अमेरिकेचा कोणताही माजी राष्ट्राध्यक्ष खुल्या रस्त्यावर कार चालवू शकत नाही. बायडेन यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, त्यांना कार चालवायला खूप आवडते.
बायडन सांगतात, ''मला ही कार खूप आवडते. या कारसोबत माझ्या अविश्वसनीय आठवणी जोडलेल्या आहेत. जेव्हा मी या कारमध्ये बसतो तेव्हा मला माझे वडील आणि मुलगा ब्यू आठवतो. देवा, माझे वडील ही कार चालवू शकतात का?'' बायडेन यांच्या मुलाचे, ब्यू यांचे 2015 मध्ये ब्रेन ट्युमरमुळे निधन झाले होते. बायडेन यांना ही कार त्यांच्या वडिलांनी लग्नावेळी भेट दिली होती. एका टीव्ही शोमध्ये बायडेन यांनी याचा किस्सा सांगितला होता. 5,600 डॉलरला तेव्हा ही कार त्यांच्या वडिलांनी घेतली होती.