साधारण डोकेदुखी समजुन करत होता दुर्लक्ष, २० वर्षानंतर झाला धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 12:21 PM2022-02-03T12:21:05+5:302022-02-03T12:24:08+5:30
आता डोकेदुखीचं एक असं कारण समोर आलंय ज्यामुळे तुमचं डोकं फिरायची वेळ येईल. हे कारण वाचून तुम्हाला धक्का बसेल पण विश्वास बसणार नाही.
अनेकदा डोकेदुखी म्हटलं की आपण साधीशी औषधाची गोळी घेतो अन् दुर्लक्ष करतो. काहीवेळा तर काही जणांना वर्षानुवर्षे डोकेदुखीची (Severe Headaches) समस्या असते. काही लोकांसाठी हे दुखणं काहीवेळा मायग्रेनही असू शकतं. मात्र या व्यतिरिक्त डोकेदुखीचं कारणं ते काय असणार? एखाद्या आजाराशिवाय आपण डोकेदुखीचं इतर काही कारण असेल असा विचार करुच शकत नाही. पण आता डोकेदुखीचं एक असं कारण समोर आलंय ज्यामुळे तुमचं डोकं फिरायची वेळ येईल. हे कारण वाचून तुम्हाला धक्का बसेल पण विश्वास बसणार नाही.
ही अतिशय विचित्र घटना असली, तरी खरी आहे. चीनमधील एका व्यक्तीला अनेक वर्षांपासून डोकेदुखीची तक्रार होती. सामान्यतः औषधोपचाराने बरं होणाऱ्या या दुखण्यामागील खरं कारण समोर आलं तेव्हा खुद्द या व्यक्तीलाही जबरदस्त धक्का बसला. त्याच्या कवटीत दोन दशकांपासून गोळी अडकली होती, याची त्याला कल्पनाही नव्हती.
शेनजेन इथे राहणाऱ्या या २८ वर्षाच्या व्यक्तीला सतत डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागत असे. हळूहळू वेदना आणखीच वाढत गेल्या आणि त्या वारंवार होऊ लागल्या. सुरुवातीला त्याला वाटलं की झोप व्यवस्थित होत नसल्याने असं होत असावं. मात्र झोप घेऊनही हा त्रास कमी न झाल्याने तो डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याची समस्या ऐकल्यानंतर तपासणी केली असता तेदेखील हैराण झाले. Shenzhen University General Hospital मध्ये व्यक्तीच्या MRI रिपोर्टमधून समजलं की त्याच्या कवटीच्या डाव्या बाजूला धातूची गोळी अडकली आहे.
डॉक्टरांनी रुग्णाला जेव्हा याबद्दल विचारलं, तेव्हा त्याला याबद्दल काही कल्पनाही नव्हती की ही गोळी त्याच्या डोक्यात कशी गेली. अखेर त्याला आठवलं की जेव्हा तो ८ वर्षाचा होता तेव्हा त्याचा भाऊ एअरगनसोबत खेळत होता, चुकून त्याच्याकडून गोळी झाडली गेली. ही गन रुग्णाच्या डोक्यावर ठेवण्यात आलेली होती. यानंतर झालेली दुखापत त्याने आपल्या केसांनी लपवली आणि आई-वडिलांना काहीही सांगितलं नाही. जखमही जास्त खोल नव्हती. त्यामुळे तो स्वतःही याबद्दल विसरून गेला.
डॉक्टरांचं म्हणणं आहे, की या घटनेतून या व्यक्तीचं जिवंत राहणं म्हणजे खरंच एक चमत्कार आहे. १ सेंटीमीटर लांब आणि ०.५ सेंटीमीटर जाड गोळी कवठीमध्ये अडकूनही २० वर्ष जिवंत राहाणं ही मेडिकल सायन्समधील अतिशय अनोखी घटना असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं.