पाकच्या त्या कारवाईचे भारताकडून स्वागत
By admin | Published: February 20, 2017 09:51 PM2017-02-20T21:51:10+5:302017-02-20T22:32:16+5:30
मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असल्याचे सज्जड पुरावे देऊनही इतकी वर्षे पाठीशी घातल्यानंतर जमात-उद-दवा (जेयूडी)चा प्रमुख हाफिज सईद याला पाकिस्तानातही दहशतवादी ठरविण्यात आले.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असल्याचे सज्जड पुरावे देऊनही इतकी वर्षे पाठीशी घातल्यानंतर जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद याला पाकिस्तानातही दहशतवादी ठरविण्यात आले. पाकिस्तानमधील पंजाब सरकारने दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत यादीमध्ये सईदचा समावेश केला आहे. पाकने हाफिज सईदवर केलेल्या या कारवाईचे भारताकडून स्वागत करण्यात आले आहे.या यादीमध्ये जर एखाद्याच्या नावाचा समावेश झाला तर ती व्यक्ती कुठल्या ना कुठल्या रुपाने दहशतवादाशी संबंधित आहे असा अर्थ काढला जातो.
भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरुप पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, देशातील दहशतवाद संपविण्याच्या दृष्टीने पाकिस्तानने उचललेले पहिले पाऊल अतिशय योग्य दिशेने पडले आहे. दहशतवाद संपवण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे भारत स्वागत करतो.
दहशतवादी हल्ल्यांमध्ये स्वत:च्या शेकडो नागरिकांचे बळी जात असलेल्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पडल्याची जाणीव झाल्यानंतर ही उपरती झाली आहे. दरम्यान, हाफिज सईद आणि त्याचा सहयोगी काजी काशिफ या दोघांची नावे एटीएच्या यादीमध्ये चौथ्या परिशिष्टात टाकण्यात आली आहेत. याबरोबरच अब्दुल्ला ओबैद, जफर इकबाल, अब्दुर रहमान, आबिद यांची नावे देखील या यादीमध्ये टाकण्यात आली आहेत.