पाऊस, निर्मनुष्य रस्त्यांनी केले ओबामांचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2016 03:23 AM2016-03-22T03:23:44+5:302016-03-22T03:23:44+5:30
८८ वर्षांत क्युबाचा दौरा करणारे पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष म्हणून बराक ओबामा हवानामध्ये पोहोचले असता पाऊस, निर्मनुष्य रस्ते आणि बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांचे स्वागत केले.
हवाना : ८८ वर्षांत क्युबाचा दौरा करणारे पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष म्हणून बराक ओबामा हवानामध्ये पोहोचले असता पाऊस, निर्मनुष्य रस्ते आणि बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांचे स्वागत केले.
ओबामा ऐतिहासिक ओल्ड टाऊन येथे पोहोचण्याच्या खूप आधीपासून पोलीस रस्त्यांच्या कडेला तैनात होते. ते साध्या वेशात होते. मात्र, त्यांची भक्कम देहयष्टी आणि चौकस नजरेमुळे त्यांना सहजरीत्या ओळखता येऊ शकत होते. तीनदिवसीय क्युबा दौऱ्यादरम्यान ओबामा यांचा पहिला मुक्काम ओल्ड टाऊनमध्येच आहे. या भागात अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यासह मोठ्या इमारतींना तात्पुरते सिल ठोकण्यात आले होते. सुरक्षा कर्मचारी छतांवरून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून होते.
क्या हाल है क्युबा?
विमानातून हवानामध्ये उतरल्यानंतर ओबामा यांनी व्टिट केले, क्या हाल है क्युबा? ओबामा यांनी त्यांचे समपदस्थ राउल कॅस्ट्रो यांच्याशी चर्चा केली. द्विपक्षीय संबंध, परस्पर सहकार्य यासह अनेक व्यूहरचनात्मक मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी होते. शीतयुद्धाच्या काळापासून उभय देशांतून विस्तवही आडवा जात नव्हता. ओबामांनी पुढाकार घेत ही कटूता दूर करण्यासाठी विविध पावले उचलली. (वृत्तसंस्था)