स्वागत नाही जंगी स्वागत झालं पाहिजे, डोनाल्ड ट्रम्प यांची ब्रिटनच्या पंतप्रधानांसमोर अट
By admin | Published: July 17, 2017 10:59 AM2017-07-17T10:59:56+5:302017-07-17T11:04:54+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जोपर्यंत ब्रिटनमध्ये आपल्या जंगी स्वागताची हमी दिली जात नाही तोपर्यंत अधिकृत दौरा करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 17 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जोपर्यंत ब्रिटनमध्ये आपल्या जंगी स्वागताची हमी दिली जात नाही तोपर्यंत अधिकृत दौरा करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान थेरेसा मे यांना सांगितलं आहे की, "जोपर्यंत योग्यरित्या माझं स्वागत केलं जाईल अशी हमी मिळणार नाही, तोपर्यत मी ब्रिटनच्या दौ-यावर येणार नाही". ट्रम्प यांनी थेरेसा मे यांना एकाप्रकारे आदेश देत आपल्या जंगी स्वागताच्या तयारीची सुरुवात करण्यास सांगितलं आहे, त्यानंतर आपण आपल्या दौ-याचा कार्यक्रम ठरवणार असल्याचंही ते बोलले आहेत. "द सन" वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प आणि थेरेसा मे यांच्यामध्ये झालेल्या संभाषणाच्या आधारे ही माहिती उघड केली आहे.
आणखी वाचा
डोनाल्ड ट्रम्प ब्रिटनचा अधिकृत दौरा करणार होते, पण सध्या त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प पुढील वर्षी हा दौरा करणार आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार ट्रम्प यांनी थेरेसा मे यांना सांगितलं आहे की, "मला गेल्या काही काळापासून ब्रिटीश मीडियामध्ये जास्त महत्व दिलं जात नाही आहे. मला योग्य ते कव्हरेज मिळत नाही आहे". ट्रम्प यांनी केलेल्या तक्रारीला उत्तर देताना थेरेसा मे यांनी सांगितलं की, "ब्रिटीश मीडिया कशी आहे हे तुम्हाला चांगलंच माहित आहे".
थेरेसा यांच्या प्रतिक्रियेवर बोलताना ट्रम्प यांना सांगितलं की, "एवढं सगळं असतानाही मला तुमच्याकडे यायचं आहे. पण यासाठी मला कोणतीही घाई नाही. जर तुमच्याकडील परिस्थितींमध्ये काही बदल करु शकलात, तर काही गोष्टी सोप्प्या होतील". ट्रम्प यांनी पुढे सांगितलं की, "जेव्हा मला वाटेल की चांगल्या प्रकारे माझं स्वागत केलं जाईल, तेव्हाच मी तिथे येईल. याआधी मी येणार नाही".
प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तांवर प्रधानमंत्री कार्यालय डाऊनिंग स्ट्रीटवरुन अद्यापपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. थेरेसा मे डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकृत दौ-यासाठी निमंत्रण देणार होत्या, मात्र ब्रिटनमधील 18 लाख लोकांनी याविरोधात एक याचिका सुरु करत त्यावर स्वाक्ष-या केल्या.
याचिकेनुसार, "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असल्याच्या नात्याने डोनाल्ड ट्रम्प यांना ब्रिटनमध्ये प्रवेश दिला पाहिजे. मात्र त्यांना ब्रिटनकडून त्यांना अधिकृत दौ-यावर येण्याचं आमंत्रण देण्याची गरज नाही. ब्रिटनच्या राणीलाही हे आवडणार नाही आणि यामुळे लाजिरवाणी परिस्थिती निर्माण होऊ शकते".