वेस्ट इंडिजचा क्रिकेटर सॅम्युअल्सला व्हायचंय पाकिस्तानी लष्करात सहभागी
By admin | Published: March 13, 2017 10:51 AM2017-03-13T10:51:48+5:302017-03-13T10:51:48+5:30
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू मार्लन सॅम्युअल्सने पाकिस्तानच्या लष्करात सहभागी होण्याची इच्छा प्रकट केली आहे.
ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. 13 - वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू मार्लन सॅम्युअल्सने पाकिस्तानच्या लष्करात सहभागी होण्याची इच्छा प्रकट केली आहे. पाकिस्तानी सुपर लीग म्हणजेच पीएसएलचा अंतिम सामना खेळण्यासाठी तो पाकिस्तानात आला असताना त्यानं ही इच्छा बोलून दाखवली. पीएसएलमध्ये मार्लन सॅम्युअल्स हा पेशावर जाल्मी संघाचं प्रतिनिधत्व करतो. लाहोरमध्ये याच संघाने पीएसएलचं विजेतेपद मिळवलं आहे.
या टीमचे मालक जावेद आफ्रिदी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून, यात मार्लन सॅम्युअल्सने पाकिस्तानी लष्करात सामील होण्याची इच्छा बोलून दाखवतो आहे. पेशावर जाल्मी संघाने पीएसएलचं जेतेपद पटकावल्यानंतर पाकिस्तानीचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी विजयी ठरलेल्या संघाची भेट घेतली. त्या भेटीनंतर वेस्ट इंडिजच्या सॅम्युअल्सने त्यांचं कौतुक केलं आहे. सॅम्युअल्स म्हणाला, पाकिस्तानात क्रिकेट खेळणं ही माझ्यासाठी मोठी अभिमानाची बाब आहे. इथल्या लोकांच्या चेह-यावर या सामन्यामुळे समाधान पाहायला मिळालं. मी मनानं आणि हृदयानं पाकिस्तानी आहे. त्यामुळे पाकिस्तानात खेळण्यास मिळाल्याचा मला आनंद आहे.
पाकिस्तानी लष्करप्रमुखांना उद्देशून सॅम्युअल्स म्हणाला, जनरल मी तुम्हाला सॅल्युट करतो. माझ्या खांद्यावर पाकिस्तानी सैन्याचा बॅच लागण्याची मी वाट पाहेन. मला पाकिस्तानी लष्कराचा एक भाग बनायचं आहे. मी मरेपर्यंत पाकिस्तानच्या सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर पेलायला तयार आहे. त्यानंतर आफ्रिदी म्हणाले, तुमच्या या सोनेरी शब्दांमुळे पाकिस्तान हा शांतताप्रिय देश असल्याचं जगाला समजेल. तू हृदयाचा विजेता आहेस. मात्र सॅम्युअल्सचं पाकिस्तानबाबत अचानक उफाळून आलेलं प्रेम पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.