आमच्याकडे बॉम्ब आहे, बंदूकधारी लाइव्ह शोमध्ये घुसले; इक्वेडोरमध्ये हल्लेखोरांकडून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 01:38 PM2024-01-11T13:38:18+5:302024-01-11T13:40:30+5:30
निवेदक आणि कर्मचाऱ्यांना हल्लेखोरांकडून करण्यात आली मारहाण
क्विटो : दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोरमध्ये एका दूरचित्रवाहिनीवर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सुरू असताना सशस्त्र गुंडांनी घुसखोरी केली. त्यांनी निवेदकावर बंदूक रोखली. त्यावेळी गोळीबार केल्याचे व लोकांच्या किंकाळ्यांचे आवाजही ऐकायला आले. मात्र त्यात किती जखमी झाले, हे कळू शकलेले नाही. या देशाचे राष्ट्राध्यक्ष डॅनियल नाओबा यांनी २२ गटांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर टीसी या दूरचित्रवाहिनीच्या कार्यालयावर या गटांनी हल्ला केला असावा, अशी शक्यता आहे. हल्लेखोरांनी आपल्या चेहऱ्यावर मास्क घातला होता.
लोकांचे हात बांधले आणि...
- स्टुडिओत शिरलेल्या हल्लेखोरांपैकी एकाने आपल्याकडे बॉम्ब असल्याचे सांगत धमकाविले. या हल्लेखोरांनी नागरिक तसेच सुरक्षारक्षकांनाही ठार मारण्याची धमकी दिली.
- काही लोकांचे हात बांधले व त्यांना जमिनीवर झोपायला सांगितले. पोलिसांना बोलावू नका, असा इशाराही त्यांना दिला.
- ६० दिवसांची आणीबाणी राष्ट्राध्यक्ष नाओबा यांनी देशात जाहीर केली.
- २२ गटांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.
- १३ सशस्त्र हल्लेखोरांना पोलिसांनी तत्काळ कारवाई करून अटक केली.
- हल्लेखोरांपैकी एकाने आपल्याकडे बॉम्ब असल्याचे सांगत धमकाविले.
तुरुंगातून पळालेल्या फिटो गुंडाची बाहेरही दहशत
गेल्या सोमवारी सगळ्यांत खतरनाक गुन्हेगार ॲडोल्फो मासियास ऊर्फ फिटो कारागृहातून फरार झाला होता. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष नाओबा यांनी देशात ६० दिवसांची आणीबाणी जाहीर केली.
फिटोवर अमली पदार्थांची तस्करी, हिंसाचार केल्याचे आरोप आहेत. सरकारच्या आणीबाणीच्या निर्णयानंतर तेथील गुंडांच्या टोळ्या अधिक सक्रिय झाल्या. त्यांतील काही टोळ्यांनी सहा पोलिस अधिकाऱ्यांचेच अपहरण केले आहे.