बहुतांश विमानांचा रंग पांढरा का?
By admin | Published: April 27, 2017 01:05 AM2017-04-27T01:05:01+5:302017-04-27T01:05:09+5:30
बहुतांश विमानांचा रंग पांढरा असतो. काही रंगीबेरंगी विमानेही तुमच्या पाहण्यात आली असतील; परंतु त्यांचा मूळ रंगही पांढराच असतो.
लंडन : बहुतांश विमानांचा रंग पांढरा असतो. काही रंगीबेरंगी विमानेही तुमच्या पाहण्यात आली असतील; परंतु त्यांचा मूळ रंगही पांढराच असतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असे का? बहुतांश विमाने पांढऱ्या रंगाची असण्यामागे अनेक कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे विमान थंड ठेवण्यासाठी त्याला पांढरा रंग दिला जातो. पांढरा रंग उष्णतारोधक मानला जातो. तो उष्णतेला इतर रंगांच्या तुलनेत अधिक दूर ठेवतो. परिणामी पांढऱ्या रंगामुळे विमानाचे तापमान कमी राखण्यास मदत होते. दुसरे कारण आर्थिक आहे. एका विमानाला रंग देण्यासाठी जवळपास ३ लाख रुपये ते एक कोटी रुपये एवढा खर्च येतो. कोणतीही कंपनी एका विमानाच्या रंगकामावर एवढा खर्च करू इच्छित नाही. त्याचबरोबर एका विमानाला रंग देण्यास ३ ते ४ आठवडे लागतात. एवढा प्रदीर्घ काळ विमान उभे राहिल्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान होऊ शकते. पांढरा रंग या सर्व समस्यांचे उत्तर आहे. उन्हामुळे इतर रंग फिकट होतात; परंतु पांढऱ्या रंगाबाबत ही समस्या नसते. त्यामुळे बहुतांश विमान कंपन्या आपल्या विमानाला हाच रंग देणे पसंत करतात. विमान कंपन्या विमानांची खरेदी-विक्री करीत असतात. त्यामुळे विमानावरील कंपनीचे नाव बदलणे किंवा आपल्या पद्धतीने त्यावर नाव टाकणे पांढऱ्या रंगामुळे सोपे होते. दुसरा रंग वापरल्यामुळे विमानाचे वजन वाढते आणि त्यामुळे इंधनाचा खर्च खूप वाढतो. पांढऱ्या रंगामुळे इंधन कमी लागते.