ऑस्कर विजेत्यांना काय मिळते? न जिंकणाऱ्यांनाही १ कोटीची खास ‘गुडी बॅग’; भारताचा दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 05:55 AM2023-03-14T05:55:02+5:302023-03-14T05:57:47+5:30

प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताने मोठी कामगिरी केल्याने सर्वांचे लक्ष या पुरस्काराकडे वेधले गेले.

what do oscar winners get 1 crore special goody bag for non winners india dominates the oscar ceremony | ऑस्कर विजेत्यांना काय मिळते? न जिंकणाऱ्यांनाही १ कोटीची खास ‘गुडी बॅग’; भारताचा दबदबा

ऑस्कर विजेत्यांना काय मिळते? न जिंकणाऱ्यांनाही १ कोटीची खास ‘गुडी बॅग’; भारताचा दबदबा

googlenewsNext

लॉस एंजिलिस: प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताने मोठी कामगिरी केल्याने सर्वांचे लक्ष या पुरस्काराकडे वेधले गेले. सोन्याचा मुलामा असलेल्या ट्रॉफीसह अनेक वस्तू यावेळी विजेत्यांना दिल्या जातात. याचवेळी केवळ मानांकन मिळालेल्यांनाही खास गिफ्ट बॅग दिली जाते. या बॅगमध्ये अतिशय महागड्या भेटवस्तूंचा समावेश असतो.

प्रतिष्ठित ऑस्कर ट्रॉफी न जिंकताही ज्यांना फक्त नामांकन मिळाले, अशांनाही एक खास गिफ्ट बॅग मिळाली. “एव्हरीवन विन्स “ ही खास गिफ्ट बॅग दरवर्षी ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशा मुख्य श्रेणींमध्ये नामांकित व्यक्तींना दिलासा म्हणून दिली जाते. 
२००२ पासून ‘डिस्टिंक्टिव्ह असेट्स’ नावाची ऑस्करशी संलग्न नसलेली लॉस एंजिल्सस्थित कंपनी ही बॅग देते. यंदाच्या बॅगमध्ये अतिशय महागड्या ब्रॅण्डच्या एकूण ६० भेटवस्तू आहेत. जपानी दुधाच्या ब्रेडपासून ते इटालियन बेटावरील सहलीपर्यंत, तसेच कॉस्मेटिक उपचार आणि अनेक लक्झरी लाइफस्टाइल वस्तू, सौंदर्य उत्पादनांचा समावेश आहे.

काय असते पॅकेज?

इटालियन लाइटहाऊसमध्ये आठ लोकांसाठी तीन रात्री (९ हजार डॉलर) राहण्याची संधी,  ‘द लाइफस्टाइल’ नावाच्या कॅनेडियन इस्टेटमध्ये (४० हजार डॉलर) स्टे पॅकेज, तसेच गार्डियनच्या म्हणण्यानुसार, यावर्षीच्या भेटवस्तूंमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये जमिनीचा प्लॉटदेखील समाविष्ट आहे. मात्र, प्लॉटचा आकार आणि नेमके ठिकाण माहीत नाही. तब्बल १,२६,००० डॉलर किंवा १.०३ कोटी किमतीच्या भेटवस्तू या बॅगमध्ये आहेत.

विजेत्याला काय मिळतात फायदे?

- ऑस्कर पुरस्कार विजेत्याला रोख रकमेचे पारितोषिक देण्यात येत नाही.

- ऑस्कर विजेत्याची ट्रॉफी ब्राँझची बनविलेली असते. तिला २४ कॅरेट सोन्याचा मुलामा दिलेला असतो.

- या पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीला एक गिफ्ट बॅग दिली जाते. अत्यंत महागड्या वस्तू या बॅगेत असतात. त्यातील वस्तूंची किंमत कोट्यवधी रुपये असते. 

-  विजेत्यांना सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांना आपले मानधन वाढविण्याची संधी मिळते. 

- ऑस्कर मिळाल्याने जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळते. त्याच्याकडे नव्या चित्रपटांच्या ऑफर्स येण्याची शक्यता वाढते. त्यांना अधिक मानधन मिळते.

...म्हणून किरवाणी बनले संन्यासी

नाटू-नाटू गाण्याचे संगीतकार एम. एम. किरवाणी यांची पत्नी एम. एम. श्रीवल्ली गरोदर होती. तेव्हा त्यांच्या गुरूंनी सांगितले की, किरवाणीला अकाली मृत्यूचा धोका आहे. दीड वर्ष संन्यासीसारखे कुटुंबापासून दूर राहिले तरच हा धोका टळू शकतो. किरवाणीने गुरूंच्या आदेशाचे पालन केले.

नृत्यदिग्दर्शकाला करायची होती आत्महत्या

‘नाटू नाटू’चे नृत्यदिग्दर्शक प्रेम रक्षितचे वडील एकेकाळी हिरे व्यापारी होते. १९९३ मध्ये त्यांचे कुटुंब इतके हलाखीत आले की वडील चित्रपटांमध्ये नृत्य सहायक बनले आणि प्रेम एका शिंप्याच्या दुकानात काम करू लागले. एके दिवशी गरिबीला कंटाळून ते आत्महत्या करण्यासाठी चेन्नईच्या मरिना बीचवर गेले; पण ते सायकल भाड्याने घेऊन आले होते. त्यामुळे आत्महत्या केली तर सायकलमुळे कुटुंबाला त्रास होईल, असा विचार करून ती सायकल ठेवण्यासाठी घरी आले. घरी येताच त्याला वडिलांनी फोनवर प्रेमला चित्रपटात काम मिळाल्याचे सांगितले. प्रेम यांनी नोकरी मिळताच आत्महत्येचा विचार सोडून दिला.

२० गाण्यांतून निवडले गेले ‘नाटू नाटू’ गाणे : ‘नाटू नाटू’ हे गाणे मैत्रीवर लिहिण्यात आले आहे. ते गाणे तयार करण्यासाठी १९ महिन्यांचा कालावधी लागला. चंद्रबोस यांनी २० गाणी लिहिली होती. त्यातून ‘नाटू नाटू’ गाणे ‘आरआरआर’ चित्रपटासाठी निवडण्यात आले.

भारतीय चित्रपटसृष्टीसाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे. ‘नाटू नाटू’ गाण्याने ऑस्कर पुरस्कार जिंकून इतिहास रचला. हे गाणे भारतीय तसेच जगभरातील संगीतप्रेमींच्या ओठावर होते. ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ हा चित्रपट हत्तींना वाचवण्यासाठी भारताच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकतो. - अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

ही फक्त एक सुरुवात आहे. भारतीय आशयाने जागतिक स्तरावर ठसा उमटवला आहे आणि ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर जिंकला आहे. संपूर्ण टीमचे अभिनंदन. - अनुराग ठाकूर, माहिती आणि प्रसारण मंत्री

मदुमलाई फॉरेस्ट रिझर्व्हमधून हत्तींच्या संरक्षणातील भारताच्या प्रयत्नांची हृदयद्रावक कहाणी गौरविली गेली आहे. प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान वाटत आहे. ऑस्कर जिंकल्याबद्दल सर्वांचे खूप अभिनंदन. - राहुल गांधी, ज्येष्ठ नेते, काँग्रेस

प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार जिंकल्याबद्दल कीरावानी, राजामौली आणि कार्तिक गोन्साल्विस यांचे हार्दिक अभिनंदन. गौरवान्वित करणाऱ्या भारतीयांना सलाम करतो. – रजनीकांत

कीरावानी आणि बोस यांचे अभिनंदन. त्यांना अपेक्षेप्रमाणे पुरस्कार मिळाला आणि त्याचे ते हकदार होते. तुम्हा दोघांनाही सलाम. - ए. आर. रहेमान

खरोखर प्रेरणादायी. द एलिफंट व्हिस्पर्ससाठी गुनित आणि अर्थ स्पेक्ट्रमचे अभिनंदन व हे करण्यासाठी आम्हाला सर्व मार्ग दाखवल्याबद्दल कीरवाणी, चंद्रबोस जी, राजामौली आणि रामचरण यांचे आभार. - शाहरूख खान

या आनंदाच्या क्षणी मला शब्दांची कमतरता आहे. मी खूप-खूप आनंदी आहे. जेव्हा नामांकन जाहीर झाले तेव्हा माझ्या हृदयाचे ठोके थांबल्यासारखे वाटले. मला काळजी वाटत होती. कारण नामांकनात रिहाना, लेडी गागाची गाणीही होती. आम्ही तणावात होतो. - प्रेम रक्षित, नृत्यदिग्दर्शक

२०२३ चे ऑस्कर पुरस्कार विजेते...

- सर्वोत्कृष्ट चित्रपट : एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल ॲट वन्स
-सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : डॅनियल क्वान, डॅनियल स्कर्नर्ट - एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल ॲट वन्स
-सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : मिशेल योह - एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल ॲट वन्स
-सर्वोत्कृष्ट अभिनेता : ब्रेंडन फ्रेझर - ‘द व्हेल’
-सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : के हुय क्वान - एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल ॲट वन्स
-सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : जेमी ली कर्टिस - एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल ॲट वन्स
-सर्वोत्कृष्ट गाणे (मूळ) : ‘नाटू नाटू’ - ‘आरआरआर’
-सर्वोत्कृष्ट पटकथा (मूळ) - एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल ॲट वन्स
-सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा : वुमन टॉकिंग
-सर्वोत्कृष्ट संपादन चित्रपट : एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल ॲट वन्स
- सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म : गिलेर्मो डेल टोरो पिनोचियो
-सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म : ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट
-सर्वोत्कृष्ट माहितीपट : नवलनी
-सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट : ‘ॲन आयरिश गुडबाय’
-सर्वोत्कृष्ट छायाचित्रण : ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंटसाठी जेम्स फ्रेंड
-सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा : ‘द व्हेल’
-सर्वोत्कृष्ट वेशभूषा : ब्लॅक पँथर : वाकांडा फॉरएव्हर
-सर्वोत्कृष्ट लघुपट : ‘द एलिफंट व्हिस्पर्स’
-सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट : द बॉय, द मोल, द फॉक्स ॲण्डड द हॉर्स
-सर्वोत्कृष्ट संगीत (मूळ) : ‘ऑल क्वायट ऑन द वेस्टर्न फ्रंट’साठी वोल्कर बर्टेलमन
-सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स : ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’
-सर्वोत्तम ध्वनी : टॉप गन : मेवरिक

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: what do oscar winners get 1 crore special goody bag for non winners india dominates the oscar ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Oscarऑस्कर