काय सांगता? कोव्हॅक्सीन लस घेतली असल्यास 14 दिवसांचे क्वारंटाईन, मोदींना सूट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 02:43 PM2021-06-17T14:43:38+5:302021-06-17T15:14:02+5:30
साऊथ कोरियामध्ये भारतीय नागरिकांसाठी 1 जुलैपासून हा नियम लागू करण्यात येत आहे. भारतातील दक्षिण कोरियाचे दूत शिंग बोंग-किल यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
नवी दिल्ली - भारतीय कंपन्यांनी उत्पादीत केलेल्या कोव्हॅक्सीन आणि कोविशिल्ड लशींची जगभरात ट्रायल सुरू आहे. त्यातच, दक्षिण कोरियाच्या राजदूत यांनी भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती दिली. जर एखादा भारतीय नागरिक साऊथ कोरियात प्रवेश करणार असेल, विशेष म्हणजे त्याने कोव्हीशिल्ड लसीचे दोन डोस घेतले असतील तर त्यास क्वारंटाईन होण्याची आवश्यकता नाही. मात्र, ज्या प्रवाशाने कोव्हॅक्सीन लसीचे दोन डोस घेतले असतील, त्यास 14 दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.
साऊथ कोरियामध्ये भारतीय नागरिकांसाठी 1 जुलैपासून हा नियम लागू करण्यात येत आहे. भारतातील दक्षिण कोरियाचे दूत शिंग बोंग-किल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, दक्षिण कोरिया सरकारने दोन आठवड्यांच्या क्वारंटाईन कालावधीला वापस घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, केवळ लसीकरण केलेल्या नागरिकांनाच हा नियम लागू होणार आहे. त्यातही ज्या नागरिकांना कोव्हीशिल्ड लसींचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना एकही दिवस क्वारंटाईन राहण्याची गरज नाही. मात्र, कोव्हॅक्सीनचे डोस घेणाऱ्यांना 14 दिवसांचे क्वारंटाईन रहावे लागणार आहे, असे किल यांनी सांगितले.
आम्ही पाहिलंय की पंतप्रधाननरेंद्र मोदींनी कोव्हॅक्सीन लस घेतली आहे. मात्र, पंतप्रधाननरेंद्र मोदी कधीही साऊथ कोरियाचा दौरा करणार असतील, तर त्यांना क्वारंटाईन राहण्याची गरज नाही. ते केव्हाही आपला दौरा करू शकतात. वरिष्ठ दर्जाचे अधिकारी, उदाहरणार्थ भारताचे सैन्यप्रमुख जर साऊथ कोरियाचा दौरा करणार असतील, तर त्यांनाही क्वारंटाईन राहण्याची गरज नाही, असेही किल यांनी स्पष्ट केले.
भारताचे कौतुक
भारताने शेजारील देशांना मोफत लसपुरवठा करण्याचा जो निर्णय घेतला, तो अतिशय महत्त्वाचा असून आंतरराष्ट्रीय पातळीवरील देशांना हा चांगला संदेश आहे, असे किल यांनी म्हटले. भारताने लसीकरणाच्या पुरवठ्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे भारताचे कौतुकही करण्यात आले.