काय सांगता! कोर्टात पुरावा म्हणून चक्क माकड आणले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 10:05 AM2023-07-24T10:05:47+5:302023-07-24T10:06:05+5:30
‘एक बंदर, होटल के अंदर’ हा हॉलिवूडचा धमाल हिंदी डब सिनेमा अनेकांना आठवत असेल.
कराची : ‘एक बंदर, होटल के अंदर’ हा हॉलिवूडचा धमाल हिंदी डब सिनेमा अनेकांना आठवत असेल. आता मात्र ‘एक बंदर, कोर्ट के अंदर’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
पाकिस्तानमधील कराचीमध्ये १४ माकडांच्या पिल्लांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. यानंतर शुक्रवारी ते न्यायालयात हजर झाले असता पुरावा म्हणून सादर केलेले माकड तेथून पसार झाले आणि थेट परिसरातील झाडावर चढले. अर्थातच न्यायालयीन कर्मचाऱ्यांना हा पुरावा परत मिळविण्यासाठी बरीच कसरत करावी लागली.
सिंधच्या वन्यजीव विभागाचे प्रमुख जावेद माहेर यांनी सांगितले की, ज्या टोपल्यांमध्ये सामान्यतः आंबे पाठविले जातात त्या टोपल्यांमध्ये माकडांची वाहतूक अत्यंत खराब स्थितीत केली जात होती. हे क्रेट्स बॉक्समध्ये बंद करून ठेवण्यात आले होते. या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने सर्व तस्करांना एक लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावला. याशिवाय सर्व माकडांना कराची प्राणीसंग्रहालयात पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जंगलात सोडा...
माकडांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाठविण्याची मागणी विभागाने न्यायालयाला केली. माकडांची ही पिल्ले खैबर पख्तुनख्वा जवळच्या जंगलातून पकडण्यात आली होती.
चीनला लंकेकडून एक लाख माकडे हवी कशाला?
चीनने काही महिन्यांपूर्वी श्रीलंकेकडे एक लाख माकडांची मागणी केली होती. श्रीलंकेचे कृषिमंत्री महिंद्र अमरवीरा यांनी १२ एप्रिल रोजी सांगितले होते की चीनने त्यांच्याकडे १००० संग्रहालयांसाठी एक लाख माकडे मागितली होती.
यावर पर्यावरणावर काम करणारे जगथ गुणवर्देना यांनी संशय व्यक्त करून चीनला ही माकडे संशोधन किंवा खाण्यासाठी तर पाहिजे नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला आहे.