काय सांगता! सर्वांत थंड ठिकाणी उगवले कलिंगड; अंटार्क्टिकामध्ये प्रयोग यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 05:29 AM2023-08-07T05:29:39+5:302023-08-07T05:29:45+5:30
आता ब्लूबेरी, स्ट्रॉबेरीवर प्रयोग
वोस्तोक : रशियन शास्त्रज्ञांनी पृथ्वीवरील जगातील सर्वांत थंड ठिकाणी कलिंगड यशस्वीरीत्या वाढवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. अंटार्क्टिकामध्ये हा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे. हे जगातील सर्वांत थंड ठिकाण आहे.
लाइव्ह सायन्स मॅगझिनने म्हटले आहे की, रशियन शास्त्रज्ञांचे हे यश एखाद्या काल्पनिक गोष्टीसारखे आहे. रशियन शास्त्रज्ञांनी मातीविरहित तंत्रज्ञानाचा वापर करून १०३ दिवसांत पिकलेले आणि गोड कलिंगड आणण्यात व पिकवण्यात यश मिळवले. वोस्तोक स्टेशनवर शास्त्रज्ञांनी ही कमाल केली आहे.
यापूर्वी तुळस वाढविली...: वोस्तोक स्टेशनवर हे पहिले उत्पादन नाही. रशियन जिओग्राफिकल सोसायटीच्या निवेदनानुसार, २०२० मध्ये, संशोधकांनी तुळस, अजमोदा, अरुगुला व कोबी यांसह विविध प्रकारच्या वनस्पतींची यशस्वीपणे वाढ केली होती.
कसा केला प्रयोग?
शास्त्रज्ञांच्या टीमने दोन प्रकारची लवकर पिकणारी कलिंगडे निवडून त्यांचा प्रयोग सुरू केला. त्यांनी बियाणे एका पातळ थरात पेरले आणि सूर्यप्रकाशासारखाच विशेष प्रकाश वापरला. रोपांचे परागीकरण कृत्रिमरीत्या केले गेले. बी लावल्यानंतर १०३ दिवसांनी जवळपास १ किलो आणि पाच इंच व्यासाचे कलिंगड मिळाले.
४३०० वर्षांचा इतिहास...
कलिंगड भारतातून नसून आफ्रिकेतील जंगली पिकातून आले. ते ४३०० वर्षांपूर्वी सुदानमध्ये दिसल्याचेही सांगितले जाते. हा उष्ण प्रदेश आहे. म्हणजेच अंटार्क्टिकाच्या थंड ठिकाणापासून दूरवर कलिंगडाचा जन्म झाला. म्हणूनच अंटार्क्टिकामध्ये त्याची वाढ स्वतःच खूप महत्त्वाची मानली जाते.