विमानतळाच्या काटेरी कुंपणावरून फेकलेल्या बाळाचं काय झालं?, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 08:59 AM2022-01-13T08:59:48+5:302022-01-13T08:59:55+5:30

अमेरिकन सैन्यानं अफगाणिस्तानातून काढता पाय घेतल्यानंतर ज्या वेगानं तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला, ते खरोखरच संपूर्ण जगासाठी आश्चर्यजनक होतं.

What happened to the baby thrown from the barbed wire fence of the airport ?, find out! | विमानतळाच्या काटेरी कुंपणावरून फेकलेल्या बाळाचं काय झालं?, जाणून घ्या!

विमानतळाच्या काटेरी कुंपणावरून फेकलेल्या बाळाचं काय झालं?, जाणून घ्या!

googlenewsNext

देश सोडून बाहेर पळण्यासाठी  उसळलेल्या प्रचंड गर्दीतून एक अफगाण बाप आपलं लहान मूल विमानतळाच्या काटेरी कुंपणावरुन पलीकडल्या अमेरिकन सैनिकांकडे देत असल्याचा हा फोटो तुम्हाला आठवतो? पुढे त्या मुलाचं काय झालं? - त्याचीच ही कहाणी, सुन्न् करणारी आणि भीषण परिस्थितीतही उमेद जिवंत ठेवता येते याचा दिलासा देणारीही!

अमेरिकन सैन्यानं अफगाणिस्तानातून काढता पाय घेतल्यानंतर ज्या वेगानं तालिबाननंअफगाणिस्तानवर कब्जा मिळवला, ते खरोखरच संपूर्ण जगासाठी आश्चर्यजनक होतं. पण तालिबाननं अफगाणिस्तान अधिकृतरित्या ताब्यात घेतल्यानंतर हादरलेल्या अनेक कुटुंबांनी अफगाणमधून पळ काढायला सुरुवात केली.  

तालिबान्यांच्या ‘जेलमधून’ आपली मुलं तरी सुटावीत म्हणून अनेक पालकांनी  काबूल विमानतळावर असलेल्या भिंतीच्या तटबंदीवरुन आपल्या लहान-लहान मुलांना  पलीकडे असलेल्या अमेरिकन सैनिकांकडे अक्षरश: फेकलं. एकच आशा होती, जगाच्या पाठीवर कुठेही जावोत, पण ती ‘सुरक्षित’ राहोत. अशाच एका घटनेत एका दोन महिन्यांच्या बाळाचाही समावेश होता. सोहेल अहमदी हे त्या बाळाचं नाव. त्याच बाळाची ही अकल्पित कहाणी...

देशाबाहेर पळण्यासाठी सोहेलचं कुटुंबही १९ ऑगस्ट रोजी काबूल विमानतळाकडे धावलं. गेटवर महाप्रचंड गर्दी होती. या गर्दीत सोहेल घुसमटू नये म्हणून गेटपासून फक्त पाच मीटर अंतरावर असताना त्याच्या पालकांनी सोहेलला अमेरिकन सैनिकांकडे भिंतीवरुन फेकलं. गेटमधून आत शिरताच, पाच मिनिटांतच आपण त्याला ताब्यात घेऊ, अशी त्यांची अपेक्षा. पण झालं विपरितच.

विमानतळाच्या गेटवरील गर्दी पाहून तिथल्या अधिकाऱ्यांनी लोकांना दंडुक्याचा धाक दाखवून मागे सारलं. या धावपळीत सोहेलचे पालकही अडकून पडले आणि महामुश्कीलीनं अर्ध्या तासानंतर त्यांना गेटमधून आत घुसता आलं. त्यांनी सोहेलचा खूप शोध घेतला. अमेरिकन सैनिकांच्या हातापाया पडून झालं, पण सोहेल सापडला नाही. हजारोंच्या गर्दीत दोन महिन्यांचा सोहेल चेंगराचेंगरीत अल्लाला प्यारा झाला असावा, असंही त्यांना वाटून गेलं. त्यांनी आकांत केला, पण काही उपयोग  झाला नाही.

सोहेलचे वडील मिर्झा अली अहमदी हे काबूलमधील अमेरिकन दुतावासात सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते. त्यांची पत्नी सुरैया आणि मिर्झा अली यांना एकूण पाच मुलं. त्यातलाच एक सोहेल. तो तर हरवला... त्या गर्दीतून त्यांना परत फिरणंही शक्य नव्हतं. अमेरिकन सैनिकांनी या कुटुंबाला एका विमानात बसवून दिलं. टेक्सास इथल्या लष्करी तळावर त्यांना उतरविण्यात आलं. डिसेंबरमध्ये हे कुटुंब मिशिगनमध्ये आलं. तोपर्यंतही त्यांना सोहेलची काहीही बित्तंबातमी कळली नाही.

दरम्यानच्या काळात समांतर अशी आणखी एक कहाणी घडली. ज्यादिवशी सोहेल हरवला, त्याचदिवशी हमीद सफी हा २९ वर्षीय तरुणही आपल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी काबूल विमानतळावर आला होता. विमानतळावर त्याला एका ठिकाणी सोहेल रडत असलेला दिसला. त्यानं त्याला लगेच उचलून घेतलं आणि आजूबाजूला चौकशी केली, पण कोणालाच सोहेलची ओळख पटली नाही. शेवटी हमीद सोहेलला आपल्या घरीच घेऊन आला.

हमीदला तीनही मुलीच. हमीदच्या म्हाताऱ्या आईला तर नातवाची प्रचंड इच्छा. डोळे मिटण्यापूर्वी नातवाचं तोंड मला बघायचंय, असं ती सारखं म्हणायची. हमीद आणि त्याच्या बायकोनंही मग ठरवलं, सोहेलचे पालक, नातेवाईक सापडले नाहीत, त्याला कोणी घ्यायला आलं नाही, तर आपणच त्याला स्वत:चा मुलगा म्हणून वाढवू. त्यांनाही ‘मुलगा’ हवाच होता.

हमीद आणि त्याच्या बायकोनं सोहेलचं मोहम्मद अबेद असं नामकरण केलं आणि आपल्याच कुटुंबातला एक म्हणून त्याला वाढवायला सुरुवात केली. सोहेलसहित आपल्या सर्व कुटुंबाचा फोटोही हमीदनं आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केला. दरम्यानच्या काळात सोहेलचे वडील मिर्झा अली यांनीही आपला मुलगा हरवल्याबाबत त्याच्या फोटोसह माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली होती. नेमकी हीच माहिती आणि फोटो हमीदच्या शेजारी राहणाऱ्या लोकांच्या नजरेस पडली. त्यांनी याबाबत सोहेलच्या वडिलांना सोशल मीडियावर कळवलं. 

मिर्झा अलींचे ६७ वर्षीय सासरे मोहम्मद कासम रज्वी अजूनही अफगाणिस्तानातच राहतात. त्यांनी आपल्या सासऱ्यांवर हमीदला शोधून सोहेलला घरी परत आणायची जबाबदारी सोपवली. सासरेबुवा हमीदच्या घरी पोहोचले. खूप रडारडीनंतर सोहेलला त्याच्या आजोबांकडे सुपूर्द करण्यात आलं. या घटनेचे व्हिडीओ पाहून सोहेलच्या कुटुंबियांच्या डोळ्यांतूनही आनंदाश्रू वाहू लागले.

Web Title: What happened to the baby thrown from the barbed wire fence of the airport ?, find out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.