मुशर्रफ यांना झालंय तरी काय? ॲमिलॉयडोसिस म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 07:13 AM2022-06-13T07:13:53+5:302022-06-13T07:14:12+5:30
पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आणि लष्करशहा परवेझ मुशर्रफ सध्या जीवनमरणाच्या दारात आहेत.
पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आणि लष्करशहा परवेझ मुशर्रफ सध्या जीवनमरणाच्या दारात आहेत. असाध्य अशा आजाराने त्यांना ग्रासले असून गेल्या तीन आठवड्यांपासून दुबईतील एका खासगी रुग्णालयात मुशर्रफ उपचार घेत आहेत. असा कोणता आजार आहे त्यांना, पाहू या...
मुशर्रफ यांना झालेला आजार
0 परवेझ मुशर्रफ यांना ॲमिलॉयडोसिस नावाचा आजार झाला आहे.
0 दुर्मीळ प्रकारातला हा आजार असून मुशर्रफ यातून पूर्णपणे बरे होणे कठीण असल्याचे बोलले जात आहे.
ॲमिलॉयडोसिस म्हणजे...
ॲमिलॉयडोसिस हा ॲमिलॉइड या प्रथिनांच्या अतिवाढीमुळे होतो.हृदय, मेंदू, किडनी, रक्तपेशी इत्यादी भागांमध्ये ही प्रथिने वाढू शकतात. इतर आजारांच्या साथीनेही ॲमिलॉइड्सचे शरीरातील प्रमाण वाढू शकते. ॲमिलॉइड प्रथिनांची अतिवाढ झाल्यास अवयव निकामी होण्याचा धोका असतो.
ॲमिलॉयडोसिस होण्याची कारणे काय?
0 अनेक प्रथिनांच्या अनिर्बंध वाढीमुळे ॲमिलॉइड्सचे प्रमाण वाढते.
0 शरीरातील विविध अवयवांमध्ये ही प्रथिने साठत जातात किंवा एकाच अवयवात ते अधिक प्रमाणात साचतात.
0 या अतिवाढीमुळे ॲमिलॉयडोसिस आजार जडतो.
ॲमिलॉयडोसिस लक्षणे काय?
प्रचंड थकवा जाणवणे । वजन कमी होणे । पोट, पाय, पायाचा घोटा यांना सूज येणे । हात वा पायांना सतत मुंग्या येणे, बधीर होणे । त्वचेचा रंग बदलणे । डोळ्याभोवती जांभळ्या रंगाची वर्तुळे दिसू लागणे । जिभेला सूज येणे । श्वसनास त्रास होणे
उपचार काय?
0 ॲमिलॉयडोसिस प्राथमिक टप्प्यात असल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.
0 परंतु ॲमिलॉइड्सचे प्रमाण खूपच वाढले असेल तर उपचारांत गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका असतो.