भारतात आता जे चाललंय, त्याला लोकशाही म्हणतात का? अमेरिकेत राज ठाकरे यांची जोरदार बॅटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 11:48 AM2024-06-30T11:48:25+5:302024-06-30T11:49:37+5:30
सान होजे बीएमएम अधिवेशनातल्या प्रकट मुलाखतीला तुफान गर्दी.
सान होजे : मतदार नावाच्या बिचाऱ्या माणसाला कुणा एका राजकीय पक्षाचे विचार आवडतात, तो त्या पक्षाला मत देऊन सत्तेवर आणतो... आणि काही महिन्यात तो पक्षच जाऊन दुसऱ्या कुणाला तरी सामील होऊन तिसऱ्याच पक्षाचं सरकार येतं; ही काय लोकशाही आहे का?, असा खणखणीत सवाल करीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमेरिकेत बीएमएमच्या व्यासपीठावरून खच्चून भरलेल्या सभागृहासमोर भारतातील बऱ्या- वाईट परिस्थितीवर रोखठोक मतप्रदर्शन केलं. यावेळी सर्वांवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली, असे त्यांनी सांगितले. आता महाराष्ट्रात जे काही चाललंय त्याच्याहून जास्त वाईट करण्याची क्षमता माझ्यात नक्कीच नाही, तेव्हा समजा दिली मला सत्ता तर याहून काही बिघडणार नाही, उलट भलंच होईल, अशी पुस्ती जोडायलाही ते विसरले नाहीत.
लोकमतच्या कार्यकारी संपादक अपर्णा वेलणकर आणि अभिनेते आनंद इंगळे यांनी अधिवेशनाच्या मुख्य व्यासपीठावर ही मुलाखत घेतली. अधिवेशनाचे मुख्य संयोजक प्रकाश भालेराव यांनी राज ठाकरे यांचं ढोल-ताशाच्या गजरात स्वागत केलं. एकविसाव्या बीएमएम अधिवेशनातला शुक्रवार चविष्ट भोजन, गाणी-गप्पा आणि बहारदार कार्यक्रमांनी रात्री उशिरापर्यंत रंगत गेला.
खोटं बोलायला माणसं ठेवीन!
मी जातपात मानत नाही. तसलं राजकारण करत नाही. सत्ता हवी यासाठी खोटं बोलणं मला जमणार नाही. वाटल्यास मी खोटं बोलायला माणसं ठेवीन!
पाणी ते टॉयलेट पेपर
मराठी माणूस दहा हजार मैलांची उडी मारून इथे येतो, यश कमावतो, त्या आत्मविश्वासाला मी सलाम करतो. अहो, पाणी ते टॉयलेट पेपर हा प्रवास काही सोपा असतो का?
‘आमचं-तुमचं’ रक्तात भिनलं
तुम्ही चिंचगुळाची आमटी अशी करता का?- आमचा मसाला थोडा वेगळा असतो; असं कोकणातली मराठी स्त्री विदर्भातल्या मैत्रिणीला सांगते. मराठी प्रांतातलं हे ‘आमचं -तुमचं’ खाण्यापिण्यापासून-राजकारणापर्यंत आपल्या रक्तात इतकं भिनलं आहे; त्यामुळेच मराठी माणूस एकजुटीने उभा राहात नाही!
नव्या कल्पना द्या, पैसे नको!
नवनिर्माण घडविण्याची ताकद असलेली कल्पना ही जगातली सगळ्यात महाग गोष्ट असते. ॲपल आणि गुगलच्या भूमीत राहणाऱ्या मराठी माणसांकडे महाराष्ट्र बदलण्याच्या काही कल्पना असतील तर मला द्या, आम्हाला तुमचे डॉलर्स नकोत !