मेस्सीच्या देशात काय चाललंय?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 09:53 AM2022-12-25T09:53:18+5:302022-12-25T09:58:08+5:30
पुन्हा संकटांच्या जाळ्यातून बाहेर कसं पडायचं, याचा ‘गेमप्लॅन’ करण्याच्या चिंतेत आता अर्जेंटिनातील जनता आहे.
पवन देशपांडे, सहायक संपादक
लिओनेल मेस्सीचाअर्जेंटिना संघ फिफा वर्ल्ड जिंकला अन् त्यांच्या देशात सात-आठ लाख लोक एकाच ठिकाणी एकत्र येऊन जल्लोष करत सुटले. मेस्सी त्यांच्यासाठी मसिहा बनला होता. बेरोजगारी, महागाईने रिकामा केलेला खिसा, नोकऱ्यांतून बसलेली किक... अन् आयुष्य सेव्ह करता-करता स्वतःच आपल्या कुटुंबीयांचे गोलकीपर झालेले असंख्य लोक आनंदोत्सवात मग्न होते... कैक महिने, अनेक वर्षांनंतर त्यांच्या घरी दिवाळी साजरी झाली.
उत्सवाचा दिवस संपला... फिफा विजयाचा फिव्हर उतरला अन् पुन्हा आर्थिक अरिष्टांचा डोंगर समोर येऊन उभा राहिला...
अर्जेंटिना आणि तेथील फुटबॉलवेडी जनता पुन्हा संकटांच्या जाळ्यातून कसे बाहेर पडायचे याचा ‘गेम प्लॅन’ तयार करण्यात चिंतामग्न झाली आहे; कारण त्यांच्या अर्थव्यवस्थेवर ओढवलेल्या संकटांचा सामना करण्यासाठी त्यांच्याकडे आता तरी कुठलीही ‘डिफेन्स लाइन’ शिल्लक राहिलेली नाही. अटॅकिंग पोझिशनवर असलेले सरकार कधीही कोसळेल आणि पुन्हा सत्तेत येईल की नाही, अशा चिंतामग्न स्थितीत जनता गेली आहे. मग तिथल्या जनतेने करावे तरी काय?
आपल्या देशात महागाई दोन अंकी झाली म्हणजेच १० च्या आसपास गेली की प्रचंड हाल सुरू होतात. अर्जेंटिनामधील महागाई १००च्या आसपास आहे. म्हणजे आपल्या सध्याच्या महागाईच्या दरापेक्षा जवळपास १५ पट. म्हणजे एखादी वस्तू तेथे जर आधी १० रुपयांना मिळत असेल तर तीच वस्तू ७०-८० रुपयांच्या असपास विकत घ्यावी लागत आहे.
बरं, महागाईचा हा अटॅक झेलायचा तर गोलकीपर सक्षम हवा. तोही नाही; कारण तेथील लोकांच्या नोकऱ्यांना कुठलीही शाश्वती राहिलेली नाही. बेरोजगारीचा दर प्रचंड वाढला आहे. करोडो लोक बेरोजगार असल्याचे चित्र आहे. या देशातील एकूण काम करणारी अर्धी टीमच घरी बसल्याच्या स्थितीत आहे.
महागाई कमी करण्यासाठी आतापर्यंत अनेकदा व्याज दरवाढ करण्यात आली आहे. हा दर आता जवळपास ७५ टक्क्यांवर गेला आहे. बरं, अर्थव्यवस्थेत पैसा ओतणार तरी किती? पेसो हे तेथील चलन छापणार तरी किती? परकीय गंगाजळी घटत गेली आहे. अशा परिस्थितीत तेथील जनता खंगत गेली आहे.
पण...
आता मेस्सीने नव्या आशा जागवल्या आहेत. फिफा वर्ल्डकपमधील विजय केवळ एका दिवसाची दिवाळी म्हणून कायम राहणार नाही, अशी आकांक्षा आहे. जसे मेस्सीचे चाहते जगभरात आहेत; तसेच अर्जेंटिनाच्या पाठीशी उभे राहायला तयार असणारेही आहेत. आयएमएफ ही जागतिक संघटना अब्जावधींचे अर्थसाहाय्य देऊ करत आहे. अनेक देशांनी अर्जेंटिनामधील खनिजांवर डोळा ठेवत मदतीचे आश्वासनही दिले आहे..
या सर्वांचा मेस्सीच्या देशाला आणि त्याच्या चाहत्यांना येत्या काळात फायदा होईल... अन् देशवासीय आनंदी आयुष्याचा कपही जिंकतील, अशी आशा आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"