ऋषी सुनक यांच्या पेनमध्ये काय आहे खास? ज्यामुळे ब्रिटनमध्ये निर्माण झालाय वाद; विरोधक आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 10:19 PM2023-06-28T22:19:56+5:302023-06-28T22:20:34+5:30
यासंदर्भात पीएम हाऊसने स्पष्टिकरण देत, ऋषी सुनक या पेनचा वापर करत नाही, असे म्हटले आहे.
ब्रिटनचे पंतप्रधानऋषी सुनक हे त्यांच्या एका पेनमुळे वादात सापडले आहेत. सुनक आपल्या दैनंदिन कामात एका अशा पेनचा वापर करतात, ज्या पेनने लिहिलेले पुसलेही जाऊ शकते. या पेनमध्ये विशेष प्रकारची शाई वापरण्यात आली आहे, जी आवष्यकता भासल्यास पुसलीही जाऊ शकते. यासंदर्भात द गार्डियन या वृत्तपत्राने खुलासा केला असून, गोपनीयतेच्या दृष्टीनेही हे धोकादायक असल्याचेही म्हटले आहे.
संबंधित वृत्तात म्हणण्यात आले आहे की, ऋषी सुनक टीव्ही अथवा इतर फोटोग्राफमध्ये ‘पायलट-व्ही’ पेनचा वापर करताना दिसून आले आहेत. या पेनने लिहिलेले शब्द पुसलेही जाऊ शकतात. सुनक या पेनद्वारे आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांदरम्यान कॅबिनेट नोट्स, सरकारी कागदपत्रे आदींवर स्वाक्षरी करताना दिसून आले आहेत. या पेनवर, लिहिलेले मिटवले जाऊ शकते, हे दर्शवणारा 'लोगो'ही (ट्रेडमार्क) आहे. कंपनीच्या वतीने याचे मार्केटिंग करताना, जे लोक शाईने लिहिण्याचा सराव करतात त्यांच्यासाठी हा पेन अत्यंत उपयुक्त आहे, कारण आपल्याकडून चूक झाली, तर लिहिलेले पुसलेही जाऊ शकते, असे म्हणण्यात आले आहे.
पीएम हाऊसचं स्पष्टिकरण -
यासंदर्भात पीएम हाऊसने स्पष्टिकरण देत, ऋषी सुनक या पेनचा वापर करत नाही, असे म्हटले आहे. ‘अशा प्रकारच्या पेनचा वापर सर्वसाधारणपणे सिव्हिल सेवेशी संबंधित लोक करत असतात. पंतप्रधान याचा वापर करत नाहीत,’ असे प्रेस सेक्रेटरीने म्हटले आहे.
विरोधकांचा निशाणा -
संबंधित वृत्तावर प्रतिक्रिया देताना, विरोधी पक्ष असलेल्या लिबरल डेमोक्रेट पार्टीचे नेते टॉम ब्रेक म्हणाले, जेव्हा राजकारणात विश्वास सर्वात खालच्या पातळीवर असतो, तेव्हा पंतप्रधानांकडून सरकारी कागदपत्रांवर अशा प्रकारचा पेन वापरण्याची घटना, तो विश्वास फ्लोअरवरून बेसमेंटमध्ये ढकलून देते.