अटकेतल्या उझबेक राजकुमारीची संपत्ती किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 09:50 AM2023-03-25T09:50:26+5:302023-03-25T09:51:08+5:30

गुलनाराचं व्यक्तिमत्त्व खरोखरच्या पॅरिस हिल्टनपेक्षाही व्यापक आहे आणि उझबेकिस्तानच्या सत्तेचा खूप मोठा वारसाही तिच्या पाठीशी आहे.

What is the wealth of the detained Uzbek princess Gulnara Karimova? | अटकेतल्या उझबेक राजकुमारीची संपत्ती किती?

अटकेतल्या उझबेक राजकुमारीची संपत्ती किती?

googlenewsNext

पॅरिस हिल्टनला ओळखता? - या अमेरिकन पॉप गायिकेचे फॅन जगभर पसरलेले आहेत. सोशल मीडियावर ती स्वत: तर कायम सक्रिय असतेच, पण तिचे चाहतेही कायम तिला चर्चेत ठेवत असतात. पॅरिस हिल्टननं आपल्या सौंदर्याची जादू कायम आपल्या चाहत्यांवर टाकली आहे. एक टॉपची माॅडेल, अभिनेत्री, फॅशन डिझायनर, निर्माती, लेखक, टीव्ही सेलेब्रिटी.. अशा अनेक भूमिकांनी ती आपल्या चाहत्यांवर मोहिनी टाकत असते. पण ती एकटीच नाही.. उझबेकिस्तानमध्येही आणखी एक ‘पॅरिस हिल्टन’ आहे.

आपलं सौंदर्य, पॉपस्टार यामुळे तिलाही उझबेकिस्तानची पॅरिस हिल्टन म्हटलं जातं. तिचं नाव आहे गुलनारा करिमोव. या गुलनाराचं व्यक्तिमत्त्व खरोखरच्या पॅरिस हिल्टनपेक्षाही व्यापक आहे आणि उझबेकिस्तानच्या सत्तेचा खूप मोठा वारसाही तिच्या पाठीशी आहे. उझबेकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष इस्लाम करिमोव यांची ती मोठी मुलगी. १९८९ ते २०१६ या काळात इस्लाम करिमोव उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते. खरे तर ते तिथले हुकूमशहाच होते. २०१६ मध्ये त्यांचं निधन झालं. त्यांच्याच काळात स्पेनमध्ये राजदूत म्हणूनही राजकुमारी गुलनारानं काम केलं आहे. गुलनारानं आज वयाची पन्नाशी पार केली आहे. पण, उझबेकिस्तानच्या तरुणांना पॉपचं वेड लावण्यात गुलनाराचा मोठा सहभाग आहे. त्यामुळेच गुलनाराला उझबेकिस्तानची ‘फर्स्ट लेडी पॉपस्टार’ म्हणूनही ओळखले जाते. तिच्या तरुणपणी तरुणांच्या हृदयावर तिनं राज्य केलं.

आजही तरुणांमध्ये ती लोकप्रिय आहे. पण हीच गुलनारा गेल्या काही काळापासून उझबेकिस्तानच्याच तुरुंगात आहे. का? - कारण कोट्यवधी डॉलर्सचा भ्रष्टाचार केल्याचा, लोकांचे पैसे हडपल्याचा आरोप तिच्यावर आहे. किती रुपयांचा असावा हा घोटाळा? या घोटाळ्याचा अंदाज तर अजून कोणालाच लावता आलेला नाही. पण, तिच्या संपत्तीचा अंदाज मात्र नुकताच जाहीर करण्यात आला आहे. ‘फ्रीडम फॉर युरेशिया’ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ‘Who Enabled the Uzbek Princess’ रिपोर्टनुसार लंडनपासून ते हाँगकाँगपर्यंत गुलनाराची संपत्ती तब्बल दोनशे कोटी अमेरिकन डॉलर्स (सुमारे दोन हजार कोटी रुपये) इतकी आहे! 

लाच आणि भ्रष्टाचाराच्या मार्गानं गुलनारानं ही संपत्ती हडपल्याचा आरोप आहे. या पैशांतून जगभरातील अनेक देशांत तिनं घरं घेतली आहेत. जेट विमान खरेदी केलं आहे. त्यासाठी ब्रिटिश कंपन्यांचाही तिनं उपयोग करून घेतल्याचं म्हटलं जातं. एकट्या लंडनमध्ये गुलनाराच्या पाच प्रॉपर्टी आहेत. त्यांची किंमत सुमारे पाचशे कोटी रुपये आहे. या भ्रष्टाचारात सामील झालेल्या ब्रिटिश कंपन्यांना जबरी दंड बसवावा आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. ब्रिटनसोबतच अमेरिकेतही गुलनाराच्या काही प्रॉपर्टी आहेत. तिथेही तिने बराच गोलमाल केल्याचे आरोप आहेत.

उझबेकिस्तानची पॉपस्टार ते एक गुन्हेगार असा गुलनाराचा प्रवास खूप झपाट्यानं झाला. २००५च्या सुमारास ‘गोगुशा’ या नावानं पॉपस्टार म्हणून गुलनारा खूपच प्रसिद्ध होती. गुलनारा एका ज्वेलरी कंपनीही मालक होती. एका सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोपही तिच्यावर ठेवण्यात आला होता. गुलनारा ४१ वर्षांची असताना तिला जन्मठेपेची शिक्षा (१४ वर्षे) सुनावण्यात आली आणि तिच्याच घरात तिला नरजकैद करण्यात आलं. पण या काळातही तिनं नजरबंदीचे नियम तोडल्यानं तिला तुरुंगात टाकण्यात आलं. तेव्हापासून आतापर्यंत ती तुरुंगातच आहे. पण, आजवर तिनं किती संपत्ती कमावली ते गुलदस्त्यात होतं. त्याची एक झलक नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालातून समोर आली आहे.

राष्ट्राध्यक्षाच्या मुलानं किंवा मुलीनं आपल्याच देशाला लुटल्याच्या घटना जगात नव्या नाहीत. त्यात इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांचा मुलगा अला आणि गमाल मुबारक यांचं नाव अग्रस्थानावर आहे. सरकारी निधीची अफरातफर आणि शेअर बाजारात इनसायडर ट्रेडिंगच्या माध्यमातून त्यांनी अब्जावधी डॉलर्सची अफरातफर केली. खूप मोठ्या संपत्तीचा अपहार केला. त्यामुळे २०१५ पर्यंत त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली होती. युरोपियन युनियननेही या दोघा भावंडांवर २०२१ पर्यंत निर्बंध लादले होते. 

गुलनाराच्या संपत्तीचा शोध सुरूच!
उझबेकिस्तानची राजकुमारी गुलनारानं आपल्यावरचे आरोप प्रत्येकवेळी नाकारले असले, आपण कोणताही गुन्हा केला नाही आणि कोणत्याही भ्रष्टाचारात आपला हात नाही असं ती म्हणत असली तरी तिच्याविरुद्धच्या सबळ पुराव्यांमुळेच तिला तुरुंगात डांबण्यात आलं आहे, असं सरकारचं म्हणणं आहे. शिवाय गुलनाराची आणखी कुठे कुठे आणि किती संपत्ती आहे, याचाही शोध सुरूच आहे.

Web Title: What is the wealth of the detained Uzbek princess Gulnara Karimova?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.