अमेरिकेचा फियॉन्से/फियॉन्सी व्हिसा स्पाऊसल व्हिसापेक्षा कसा वेगळा असतो?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 12:13 PM2020-06-13T12:13:12+5:302020-06-13T12:13:38+5:30
फियॉन्से/फियॉन्सी आणि स्पाऊसल या दोन्ही व्हिसांसाठी अर्जदाराला मुंबईतील अमेरिकेच्या दूतावासात येऊन मुलाखत द्यावी लागते.
प्रश्न- अमेरिकेचा फियॉन्से/फियॉन्सी व्हिसा स्पाऊसल व्हिसापेक्षा कसा वेगळा असतो?
उत्तर- अमेरिकेच्या फियॉन्से/फियॉन्सी व्हिसाला के-१ व्हिसादेखील म्हटलं जातं. अमेरिकेचे नागरिक असलेल्या व्यक्तीच्या परदेशातील फियॉन्से/फियॉन्सीसाठी हा व्हिसा दिला जातो. के-१ व्हिसा मिळाल्यानंतर परदेशातील व्यक्तीला अमेरिकेत येण्याची परवानगी मिळते. अमेरिकेत आल्यानंतर ९० दिवसांत त्याला/तिला अमेरिकेच्या नागरिकाशी विवाह करावा लागतो.
स्पाऊसल व्हिसा इमिग्रंट प्रकारचा व्हिसा असून तो अमेरिकेचे नागरिक असलेल्या किंवा अमेरिकेची कायदेशीर कायम रहिवासी असलेल्या (ग्रीन कार्डधारक) व्यक्तीच्या पती/पत्नीला दिला जातो. सीआर-१ स्पाऊसल व्हिसा लग्नाला दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी झालेल्या दाम्पत्याला दिला जातो. तर आयआर-१ व्हिसा लग्नाला दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या दाम्पत्याला देण्यात येतो.
लग्न झालेल्यांनीच स्पाऊसल व्हिसासाठी अर्ज करावा. फियॉन्से/फियॉन्सी व्हिसासाठी लग्न झालेल्यांनी अर्ज करू नये. भारतात धार्मिक विधी करून लग्न केलेल्या व्यक्ती अमेरिकेच्या फियॉन्से/फियॉन्सी व्हिसासाठी पात्र ठरू शकत नाहीत.
अर्जदारानं आधीच झालेल्या लग्नाची किंवा ते अमेरिकेत लग्न करण्याच्या उद्देशानंच येत असल्याची माहिती लपवली तर ती फसवणूक ठरते. व्हिसा मिळवण्यासाठी अर्जदारानं त्याच्या लग्नाबद्दल जाणीवपूर्वक खोटी माहिती दिल्यास तो/ती कायमस्वरुपी अपात्र ठरू शकतो/शकते.
फियॉन्से/फियॉन्सी आणि स्पाऊसल या दोन्ही व्हिसांसाठी अर्जदाराला मुंबईतील अमेरिकेच्या दूतावासात येऊन मुलाखत द्यावी लागते. यावेळी अर्जदारानं प्रामाणिकपणे उत्तरं द्यावी. याशिवाय अर्जातही खराखुरा तपशील द्यावा.