'या' देशांतील सर्वाधिक लोक करतात शेती; जगातील कृषीप्रधान देश कोणते?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 12:55 PM2018-07-30T12:55:21+5:302018-07-30T12:59:24+5:30

विकसीत देशांमध्ये शेतीवर आधारित लोकसंख्येचे प्रमाण अत्यंत कमी आहे तर जेथे उद्योग कमी आहेत, मागासलेपण आहे अशा देशांमध्ये शेतीवर आधारित लोकसंख्या जास्त आहे.

What percentage of population is employed in agriculture? | 'या' देशांतील सर्वाधिक लोक करतात शेती; जगातील कृषीप्रधान देश कोणते?

'या' देशांतील सर्वाधिक लोक करतात शेती; जगातील कृषीप्रधान देश कोणते?

googlenewsNext

मुंबई- शेती हा माणसाच्या पोट भरण्यासाठी केलेल्या व्यवसायांपैकी एक आदिम मार्ग आहे. अत्यंत प्राचीन काळापासून माणसाने शेतीचा मार्ग स्वीकारला आहे. शेतीमुळे जगातील संस्कृतींचा उगम आणि विकास झालाय जगातील बहुतांश लोकसंख्या शेतीवर आधारीत असली तरी शेतीवर अवलंबून असण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. 
विकसीत देशांमध्ये शेतीवर आधारित लोकसंख्येचे प्रमाण अत्यंत कमी आहे तर जेथे उद्योग कमी आहेत, मागासलेपण आहे अशा देशांमध्ये शेतीवर आधारित लोकसंख्या जास्त आहे.

आफ्रिकेतील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांचा कणा शेतीवर टिकून आहे. जागतिक बँकेने 2017 साली जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये शेतीवर अवलंबून असणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी पहिले 10 देश आफ्रिकेतील आहे. आफ्रिकेतील पूर्वेकडे असणाऱ्या बुरुंडी देशाची 91 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे मात्र एकूण कृषीउत्पन्नापैकी केवळ 15 टक्के उत्पादनेच बाजारात जातात. रताळे, केळी, मका ही तेथील महत्त्वाची पिके आहेत.

त्यानंतर चाड या आफ्रिकेतील देशातील 87 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. त्यानंतर या यादीमध्ये सोमालिया, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, मालावी, इरिट्रीया, गिनी बिसाऊ, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, नायजर, मॉरिशियाना, मादागास्कर आणि मोझांबिक यांचा समावेश आहे.

विकसनशील देशांतील ब्रिक्सदेशांमध्ये भारताची लोकसंख्या उपजिविकेसाठी सर्वाधीक शेतीवर अवलंबून असल्याचे दिसून येते. सिंधू संस्कृतीमध्ये भारतीय कृषीव्यवस्थेची बिजे रुजली ती आजही तितक्याच प्रमाणात देशाची अर्थव्यवस्था सांभाळत आहेत. भारतातील 43 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेतील केवळ 6 टक्के लोकसंख्या शेती करते.
विकसित देशांमध्ये मात्र शेती करण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. या देशांमध्ये शेतीचे प्रमाण 15 टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे दिसून येते. ग्रीस, मलेशिया रशिया, न्यू झीलंड, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, इटली, जपान, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका यांचा त्यात समावेश होतो. संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर आणि हाँगकाँगची शून्य टक्के लोकसंख्या शेती करते.

2017 च्या आकडेवारीनुसार जगभरातील विविध देशांमधील किती लोक शेती करतात? (टक्केवारीमध्ये)
बुरुंडी 91, चाड, 87, सोमालिया 86. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक 86, मालावी 85, इरिट्रीआ 84, गिनी-बिसाऊ 83, कांगो 82, नायजर 76, मॉरिशियाना 76, मादागास्कर 74, मोझांबिक 73, नेपाळ 72, रशिया 7, पोर्तुगाल 7, ओमान 7, न्यू झीलंड 7,  फ्रान्स 3, ऑस्ट्रेलिया 3, कॅनडा 2, कतार 1, युएई 0, सिंगापूर 0, हाँगकाँग 0

Web Title: What percentage of population is employed in agriculture?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.