अवकाशातला कचरा माणसासाठीही धोकादायक?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 04:09 AM2020-10-09T04:09:18+5:302020-10-09T04:09:32+5:30
शास्रज्ञांच्या अंदाजानुसार पृथ्वीभोवती सात हजार ६०० टन अवकाश कचरा
पृथ्वीप्रमाणेच कचऱ्याची समस्या आता अवकाशातही जाणवू लागली आहे. अवकाशात पृथ्वीभोवती इतका कचरा वाढू लागला आहे की, त्यासाठी मोहीम सुरू करावी लागली आहे. शास्रज्ञांच्या अंदाजानुसार पृथ्वीभोवती सात हजार ६०० टन अवकाश कचरा आहे.
या कचऱ्याचा धोका काय?
समजा कचऱ्याचा छोटा तुकडा अवकाशात एखाद्या उपग्रहाला लागला तर त्या उपग्रहाचे हजारो तुकडे होऊ शकतात. एवढेच नाही तर त्या उपग्रहाची गती २५ हजार किलोमीटर प्रति तास एवढी वाढण्याचाही धोका आहे. या वेगाने अवकाशात फिरणारे उपग्रहाचे तुकडे इतरही उपग्रहांना धोकादायक ठरू शकतात. हे तुकडे मानव असलेल्या अवकाशयानाला धडकल्यास काय होईल, याचा विचारच न केलेला बरा.
कचरा तयार कसा होतो?
आता अवकाशात उपग्रह सोडण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. खासगी कंपन्याही उपग्रह पाठवू लागल्या आहेत. उपग्रह अवकाशात पोहोचवण्यासाठी लागणारे रॉकेट्स आणि त्याचे भाग मग सहसा पृथ्वीवर परत येत नाहीत. ते पृथ्वीभोवतीच फिरत राहतात. त्यामुळे साहजिकच जितके जास्त रॉकेट अवकाशात जातील, तितका कचरा जास्त कचरा वाढत जाणार.
वापरात नसलेल्या उपग्रहांचाही धोका
अवकाशात उपग्रह पाठवल्यानंतर तो सहसा १० ते १५ वर्षे काम करत असतो. त्यानंतर तो निकामी होतो. पण तो अवकाशातच फिरत राहतो. शिवाय काही उपग्रह अवकाशात गेल्यानंतर अयशस्वी होतात. त्यामुळे तेही फिरत असतातच. त्यामुळे जितके उपग्रह अवकाशात जातील, तितका धोका वाढत जाणार आहे.