पेट्रोल फुकट...! कचरा कुंडीत नोटांचा खच; पाहिलाय का असा अजब देश?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 03:35 PM2018-08-21T15:35:05+5:302018-08-21T15:43:09+5:30
महागाईशी दोन हात करण्यासाठी सरकारने चक्क लाखाच्या नोटेवरून पाच शुन्यच काढून घेतले
कॅराकस : अमेरिकेतील एक देश असलेल्या व्हेनेझुएलामध्ये महागाईने थैमान घातले आहे. एक किलो मटन खरेदी करण्यासाठी या देशाच्या लोकांना मोठ्या टोपलीमध्ये नोटा भरून द्याव्या लागत आहेत. या महागाईशी दोन हात करण्यासाठी सरकारने चक्क लाखाच्या नोटेवरून पाच शुन्यच काढून घेतले आहेत. यामुळे पाच लाखांची बोलिवर एकाएकी पाच बोलिवर एवढ्या क्षुल्लक किंमतीला आली आहे.
चलनाला काहीच किंमत न राहिल्याने व्हेनेझुएलाचे लोक या नोटा कचऱ्यात फेकून देत आहेत. एक किलोची एखादी वस्तू घेण्यासाठी टोपल्यांमधून नोटा द्याव्या लागत आहेत. खनिज तेलाने समृद्ध असलेल्या या देशात बघावे तिकडे नोटा टाकलेल्या दिसत आहेत.
कच्च्या तेलाने समृद्ध असलेल्या या देशाची अर्थव्यवस्था कोसळण्याच्या स्थितीत आली आहे. या वर्षीच्या शेवटपर्यंत किमान मजुरी 3000 टक्के तर महागाई दरामध्ये 1 लाख टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. यावरुन व्हेनेझुएलामधील परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो.
अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी तेथील सरकारने एक लाखावरील पाच शून्यच कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी तर तेथील पेट्रोलियम उत्पादनांच्या दरांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे वाढ करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, यामुळे परिस्थिती आणखी हाताबाहेर जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
या अनागोंदीमुळे विरोधकांनी आज देशव्यापी बंदचे आवाहन केले आहे. मादुरो यांच्या सरकारविरोधात लोकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे.
नव्या चलानी नोटांना बाजारात आणण्यासाठी सोमवारी येथील बँकाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. अद्याप या देशात पेट्रोल, डिझेल मोफतच मिळते असे म्हणायला हरकत नाही. यामुळे अन्य देशांमध्ये येथील पेट्रोलची तस्करी करण्याचे प्रमाणही लक्षणिय आहे.
मादुरो यांनी शुक्रवारी किमान मजुरीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली होती. मात्र, अर्थतज्ज्ञांच्या मते यामुळे महागाई आणखीनच वाढणार आहे.