ट्रम्प यांच्या टॅरिफचा भारतावार काय परिणाम होणार? गृहमंत्री अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 11:14 IST2025-04-10T11:03:18+5:302025-04-10T11:14:39+5:30
"याचे (टॅरिफ) परिणा निर्धारित करणे सध्या घाईचे होईल. टॅरिफचा सामना करणारा भारत हा काही एकमेव देश नाही."

ट्रम्प यांच्या टॅरिफचा भारतावार काय परिणाम होणार? गृहमंत्री अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
सध्या संपूर्ण जगभरात अमेरिकेने सुरू केलेल्या टॅरिफ वॉरची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील निर्णयाने संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली आहे. यातच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी (9 एप्रिल 2025) यासंदर्भात भाष्य केले. ते म्हणाले, "बाहेरील दबावामुळे भारतीय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही. संपूर्ण जगभरात अनिश्चिततेचे वातावरण असतानाच आपली अर्थव्यवस्था मजबूत आहे. ती अशा प्रकारच्या दबावाचा सामना करण्यास सक्षम आहे." शाह दिल्ली येथे 'रायझिंग इंडिया समिट' मध्ये बोलत होते.
शाह पुढे म्हणाले, "याचे (टॅरिफ) परिणा निर्धारित करणे सध्या घाईचे होईल. टॅरिफचा सामना करणारा भारत हा काही एकमेव देश नाही. अनेक देश टॅरिफचा सामना करत आहेत. कदाचित आपला माल इतर देशांमध्येही निर्यात केला जाऊ शकतो."
शाह पुढे म्हणाले, "अमेरिकन टॅरिफ एक जटिल मुद्दा आहे. याच्या परिणामांचे घाईगडबडीने निर्धारण करणे योग्य नाही. भारताची अर्थव्यवस्था लवचिक आहे. यामुळे अशा प्रकारच्या बाहेरील दबावामुळे भारतीय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार नाहीत.
अमेरिकेसोबत चर्चा करेल भारत - पीयूष गोयल
तत्पूर्वी, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे की, भारत राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टॅरिफमधून सूट मिळवण्यासाठी अमेरिकेसोबत चर्चा करेल. भारताने या वर्षाच्या अखेरपर्यंत अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार करार (BTA) करण्यास सहमती दर्शवली आहे.
लवकरच चर्चा होईल अन्..., काय म्हणाले जयशंकर? -
एका खाजगी टीव्ही चॅनेलच्या कार्यक्रमात बोलताना भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी पहिल्यांदाच अमेरिकेच्या टॅरिफ निर्णयावर थेट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, इतक्यात अमेरिकन शुल्काच्या परिणामाचे मूल्यांकन करणे फार घाईचे ठरेल. परंतु भारताने वर्षाच्या अखेरीस अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार करार (BTA) करण्याची धोरणात्मक योजना आखली आहे. जयशंकर पुढे म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेसोबत व्यापार करारासाठी तत्वतः करार करणारा भारत हा कदाचित एकमेव देश आहे. आम्ही निर्णय घेतला आहे की, या मुद्द्यावर ट्रम्प प्रशासनाशी लवकरच चर्चा केली जाईल आणि या वर्षाच्या अखेरीस बीटीएवरील चर्चा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
प्रतिक्रिया देण्याची घाई नको
जयशंकर यांनी असेही नमूद केले की, भारताने या प्रकरणावर अतिशय संतुलित आणि विचारशील प्रतिसाद दिला आहे. त्याचा प्रत्यक्ष परिणाम काय होईल, हे आम्हाला अद्याप माहित नाही. त्यामुळेच आम्ही घाईघाईने त्यावर प्रतिक्रिया देणार नाही. आम्ही ठोस चर्चा आणि कराराकडे वाटचाल करत आहोत, असेह त्यांनी स्पष्ट केले.