रशियाचं ‘गौडबंगाल’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 04:01 PM2020-03-28T16:01:28+5:302020-03-28T16:02:01+5:30
चीन आणि रशिया. जगातले हे दोन देश असे आहेत, ज्यांच्याविषयी संपूर्ण जगात कुतुहल आहे. तिथे नेमकं काय चाललंय, हेच लोकांना कळत नाही. कळलं तरी ते खरं असेल का, याविषयीही लोकांच्या मनात कायम शंकाच असते.
लोकमत-
चीन आणि रशिया. जगातले हे दोन देश असे आहेत, ज्यांच्याविषयी संपूर्ण जगात कुतुहल आहे. तिथे नेमकं काय चाललंय, हेच लोकांना कळत नाही. कळलं तरी ते खरं असेल का, याविषयीही लोकांच्या मनात कायम शंकाच असते.
आताही कोरोना व्हायरसनं अख्ख्या जगाला वेड्यात काढलं असताना चीनमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची खरी संख्या किती, याबाबत सूंपर्ण जगात साशंकता आहे. एकीकडे इटलीसारख्या छोट्याशा देशात मृतदेहांचा खच पडत असताना, बलाढय़ चीनमध्ये मृत्युमुखी पडलेली माणसं इटलीपेक्षा कमी कशी, असा प्रo्न जगाला पडला आहे.
तीच स्थिती रशियाची. कोरोनानं संपूर्ण जगाला आपल्या मरणमिठीत आवळायला सुरुवात केली असताना, रशियात कोरोनानं अजून शिरकाव कसा केला नाही, याचं अनेकांना राहूनराहून आश्चर्य वाटतंय.
शिवाय रशिया म्हणजे काही इल्लूटिल्लू देश नाही. भौगोलिकदृष्ट्या रशिया हा जगातला सर्वांत मोठा देश. तब्बल सोळा देशांच्या सीमा रशियाला लागून आहेत. त्यात चीनचाही समावेश आहे. रशियाची लोकसंख्याही सतरा कोटीच्या वर. तरीही आजच्या घडीला, म्हणजे मंगळवार, दि. 24 मार्चपर्यंत रशियात कोरोनाबाधित मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आहे केवळ एक आणि बाधित आहेत फक्त 438!
रशिया म्हणतं, आम्ही सुरुवातीपासूनच इतकी काळजी घेतली, की कोरोनाला हातपाय पसरायला जागाच दिली नाही. रशियन प्रेसिडेंट व्लादिमिर पुतीन यांनीही यासंदर्भात नुकतंच भाष्य करताना सांगितलं, सुरुवातीलाच प्रतिबंधक उपाय योजल्यामुळे कोरोनाला आम्ही चांगलाच अटकाव घातला आहे आणि आमच्याकडे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.
रशियन अधिकार्यांचंही म्हणणं आहे, चीनमधून सुरुवात झालेल्या कोरोनाची कुणकुण लागल्याबरोबर आम्ही चीनबरोबरची तब्बल 4200 किलोमीटरची सीमा तातडीनं, 30 जानेवारीलाच सिल केली, ठिकठिकाणी क्वॉरण्टाइन झोन्स सुरू केली, तपासणीसाठी शेकडो लॅब उभारल्या, अमेरिकाही मार्चमध्ये जागं झालं, पण आम्ही मात्र फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच लोकांच्या तपासण्या सुरू केल्या, आतापर्यंत तब्बल एक लाख साठ हजार लोकांच्या तपासण्याही झाल्या आहेत, चीन, इराण आणि दक्षिण कोरियांच्या प्रवाशांवर सुरुवातीपासूनच अधिक लक्ष दिलं होतं.
रशियाचं म्हणणं खरं असेलही, पण इतिहास दडपण्याचा त्यांचा वारसा जुनाच आहे. 1986 ची चेर्नोबिल अनुभट्टी दुर्घटना, 1980मध्ये एचआयव्ही/एड्सची साथ. हा इतिहास लोकांना माहीत आहे.
आत्ताही कोरोनापासून वाचण्यासाठी लोकांनी घरातच राहावं यासाठी रशियानं तब्बल आठशे सिंह आणि वाघ रस्त्यावर सोडले अशी अफवा झपाट्यानं सोशल मिडियावर व्हायरल झाली. ही अफवाच आहे, हे सिद्ध झालं असलं तरी रशियानं असं केलेलं असू शकतं, यावर लोकांचा आजही विश्वास आहे, कारण रशियाचा इतिहास! रशियानं कोरोनाविरोधात खरंच भक्कम पावलं उचलली असतील, तर त्यांचं अभिनंदन, पण आपली प्रतिमाही त्यांनी सुधारायला हवी.