व्हॉट्सअॅपचा सह संस्थापक म्हणतोय, 'फेसबुक डिलीट करून टाका!'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 10:48 AM2018-03-21T10:48:53+5:302018-03-21T10:48:53+5:30
व्हॉट्सअॅपचे सह-संस्थापक ब्रायन अॅक्टन यांनी ट्विटरवर फेसबुक डिलीट करण्याचं आवाहन केले आहे.
वॉशिंग्टन - अमेरिकेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये फेसबुक डेटा चोरी व लीक प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. कोट्यवधी युजर्सचा डेटा चोरुन आपल्या खासगी फायद्यासाठी विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणानंतर फेसबुकवरील गोपनीयतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यामुळे फेसबुकला जोरदार फटकादेखील बसला आहे. फेसबुकच्या शेअर्समध्ये तब्बल 7 टक्क्यांनी घसरण झाली आहे. शेअर्स घसरल्याने फेसबुकला जवळपास 6.06 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅपचे सह संस्थापक ब्रायन अॅक्टन यांनी ट्विटरवर फेसबुक डिलीट करण्याचं आवाहन केले आहे. 'ही योग्य वेळ असून फेसबुक डिलीट करा',असे ट्विट ब्रायन अॅक्टन यांनी केले आहे.
It is time. #deletefacebook
— Brian Acton (@brianacton) March 20, 2018
काही दिवसांपूर्वी राजकीय डाटा विश्लेषक कंपनी कॅम्ब्रिज ऍनालिटिकाने कोणतीही परवानगी न घेता फेसबुकवरील 5 कोटी युजर्सचा डेटा चोरल्याचे प्रकरण समोर आले. यानंतर सुरू असलेल्या घडामोडींदरम्यानच व्हॉट्सअॅपचे सहसंस्थापक ब्रायन अॅक्टन यांनी फेसबुक डिलीट करण्यासंदर्भातील ट्विट केले आहे.
2014 मध्ये फेसबुकने व्हॉट्सअॅपला खरेदी केले. व्हॉट्सअॅपची विक्री झाल्यानंतरही कॅम्ब्रिज अॅनालिटिका फेसबुकशी जोडलेले होते. मात्र वर्षाच्या सुरुवातीला आपली स्वत:ची सिग्नल फाऊंडेशन कंपनी सुरू करण्यासाठी त्यांनी फेसबुक सोडले. दरम्यान, फेसबुकने डेटा लीक प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन फॉरेन्सिक कंपन्यांची नियुक्ती केली आहे. फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक कंपनी स्ट्रॉज फ्राइडबर्ग कॅम्ब्रिज अॅनालिटिकाचं ऑडिट करणार आहे.