व्हॉट्सअॅपचा संवाद आता पूर्णपणे गोपनीय !
By admin | Published: April 7, 2016 02:59 AM2016-04-07T02:59:26+5:302016-04-07T02:59:26+5:30
व्हॉट्सअॅप या मेसेजिंग अॅपवर होणारा संवाद आता पूर्णपणे सुरक्षित झाला असून मेसेज पाठविणारी आणि रिसिव्ह करणारी व्यक्तीच हा मेसेज वा अन्य माहिती पाहू शकणार आहे.
न्यूयॉर्क : व्हॉट्सअॅप या मेसेजिंग अॅपवर होणारा संवाद आता पूर्णपणे सुरक्षित झाला असून मेसेज पाठविणारी आणि रिसिव्ह करणारी व्यक्तीच हा मेसेज वा अन्य माहिती पाहू शकणार आहे. याखेरीज अन्य कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीस अथवा संस्थेस हे संदेश वाचणे शक्य होणार नाही. वापरकर्त्या व्यक्तींचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य व गोपनीयता अबाधित राहावी व याचा आदर
व्हावा, याकरिता हे फीचर सुरू करण्यात आल्याची माहिती व्हॉट्सअॅप कंपनीचे सह संस्थापक जॅन कॉम आणि ब्रायन रोट यांनी दिली आहे.
या दोघांनी संयुक्तरीत्या एक ब्लॉग पोस्ट केला आहे. यात नव्या फीचरबाबत माहिती देण्यात आली आहे. सायबर क्रिमिनल, हॅकर्स आणि सरकारपासून आता हे संदेश सुरक्षित राहणार आहेत. यात ग्रुप चॅटिंगचाही समावेश आहे. मेसेज, फोटो, व्हिडीओ, फाइल आणि व्हॉइस मेसेज आता सुरक्षित राहणार आहेत. यामुळे मेसेजिंग अॅपसंदर्भात ग्राहकांच्या मनातील विश्वासार्हता आणखी वाढेल आणि संवादाचे एक हक्काचे माध्यम म्हणून हे व्यासपीठ विकसित होईल, असे या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. सरकार आणि सुरक्षा एजन्सी वेळप्रसंंगी व्हॉट्सअॅपचे मेसेज ट्रेस करत होत्या. पण नव्या फीचर्समुळे आता हे शक्य होणार नाही.
सुरक्षेच्या बाबतीत अॅपल आणि ब्लॅकबेरी यांचा क्रमांक लागतो. आता यात व्हॉट्सअॅपची भर पडणार आहे. सुरक्षेच्या व संदेशातील गोपनीयतेच्या मुद्द्यावर रिसर्च इन मोशन (ब्लॅकबेरी) कंपनीने गेल्या चार वर्षांपूर्वी मोठा लढा दिला होता. ब्लॅकबेरी स्वत:च्या सर्व्हरच्या आधारे सुरक्षित व गोपनीयतेची हमी देत होती. जगभरातील तपास यंत्रणांनी यावर आक्षेप घेतला होता. मात्र, शेवटी ब्लॅकबेरी हा लढा जिंकली होती. (वृत्तसंस्था)
> व्हॉट्सअॅपही आता सुरक्षित झाल्यामुळे एखाद्या तपासात जर तपास यंत्रणांना मेसेजिंग तपासायचे असतील तर आजवर ते तपासणे सोपे होते.
पण आता मात्र कंपनीशी पत्रव्यवहार करून आणि परवानगी घेऊन तसेच तांत्रिक अडथळे पार करून हे करावे लागेल. अर्थात असे करूनही हाती काही ठोस लागेल याची खात्री नाही. परिणामी, तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढणार आहे.