चीनमधील पुरामुळे गहू, तांदूळ महागणार, एकीकडे दुष्काळ दुसरीकडे महापूर चीनवर मोठं संकट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 06:34 AM2022-08-28T06:34:05+5:302022-08-28T06:35:15+5:30
China: जोरदार पाऊस आणि पुराचा मोठा फटका यंदा चीनला बसला आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कापणी हंगाम तोंडावर असताना हे संकट कोसळल्याने यंदा तांदूळ आणि गव्हाच्या उत्पादनावर मोठा दुष्परिणाम झाला आहे.
जोरदार पाऊस आणि पुराचा मोठा फटका यंदा चीनला बसला आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कापणी हंगाम तोंडावर असताना हे संकट कोसळल्याने यंदा तांदूळ आणि गव्हाच्या उत्पादनावर मोठा दुष्परिणाम झाला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे चीनमधील शेती याआधीच संकटात सापडली आहे. चीनमधील जनतेची गरज भागवण्यासाठी यंदा चीनला तांदूळ आणि गहू मोठ्या प्रमाणावर आयात करावे लागणार आहे. या स्थितीत जगभर या उत्पादनांचा तुटवडा निर्माण होऊन किमती मोठ्या प्रमाणावर भडकण्याची शक्यता आहे.
चीनची आयात वाढल्याने जगभर टंचाई
रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात अन्नधान्याच्या किमती या आधीच भडकल्या आहेत. कमी उत्पादन झाल्याने चीनला आपल्या गरजा भागवण्यासाठी अन्नधान्याची आयात मोठ्या प्रमाणावर करावी लागणार आहे. यामुळे अन्नधान्याची टंचाई जगभर जाणवू शकते व त्यांच्या किमती भडकू शकतात.
७५% उत्पादनाला फटका
७५ टक्के पिकाची कापणी पुढील दोन महिन्यात केली जाते. गहू आणि कापूस कापणीचा हंगाम तोंडावर आहे. पुरामुळे गहू, कापूस आणि मका या पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.
एकीकडे उष्णतेची लाट
दक्षिण चीनला उष्णतेच्या लाटेचा मोठा फटका बसला आहे.
इथे आजवरच्या सर्वाधिक विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे.
या भागात उष्णतेच्या लाटेचा ७० वा दिवस आहे. सलग १० व्या दिवशीही उष्णतेचा रेट अलर्ट जारी करण्यात आला आहे.
४५ अंश
१ ऑगस्टपासून संपूर्ण चीनमध्ये सरासरी ४५ अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.
दुसरीकडे पाऊस आणि पूर
- चीनच्या मोठ्या भूभागाला यंदा पुराचा फटका बसला आहे.
- यांगत्से नदीच्या दोन्ही बाजूला विशेषत: सिचुआर खोऱ्याला यंदा दुष्काळाचा फटका बसला आहे. या भागात चीनचा निम्म्याहून अधिक तांदूळ पिकवला जातो.
- दुष्काळामुळे यांगत्से नदीच्या प्रवाहात नेहमीपेक्षा यंदा ५० टक्के पाणी कमी आहे.
- यंदा आलेल्या पुरामुळे चीनच्या उत्तर-पश्चिमेतील पर्वतमय परिसरात आतापर्यंत १६ जणांचा बळी गेला आहे.
- उत्तर चीनमध्ये यापुढेही जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.