पाकिस्तान कोर्टात पुरावे म्हणून सादर केली गेली 14 माकडं, एक झालं फरार अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 02:04 PM2023-07-24T14:04:30+5:302023-07-24T14:05:45+5:30
पाकिस्तानात माकडांना चोरी करण्याचे प्रशिक्षणही दिले जाते...!
पाकिस्तानातून एक मजेशीर घटना समोर आली आहे. गेल्या गुरुवारी कराचीमधून माकडांच्या तस्करी प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली. यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी 14 माकडांना पुराव्याच्या स्वरुपात न्यायालयात सादर केले होते. मात्र यांपैकी एक माकड पळून गेले. यानंतर न्यायालयात एकच गोंधळ उडाला. येथील कर्मचाऱ्यांनीही त्याला झाडावरून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला.
पेटाऱ्यात ठेवण्यात आली होती माकडं -
संबंधित आरोपी आंब्यांच्या निर्यातीसाठी वापरल्या जाणार्या पेटीतून 14 माकडांच्या पिलांची तस्करी करण्याच्या प्रयत्नात होते. शुक्रवारी या माकडांना न्यायालयात हजर केले असता, त्यांतील एक माकड पळून गेले, यानंतर त्याला पकडण्यासाठी दिवसभर प्रयत्न सुरू होते. यासंदर्भात बोलताना सिंध वन्यजीव विभागाचे प्रमुख जावेद महार म्हणाले, माकडांना पेटाऱ्यात अशा पद्धतीने ठेवण्यात आले होते की, त्यांना श्वास घेणेही कठीन जात असावे. पाकिस्तानमध्ये वन्य प्राण्यांचा व्यापार करणे अथवा ते पाळण्यावर बंदी आहे. मात्र, नियमांचे सातत्याने उल्लंघन केले जाते.
माकडांना दिले जाते चोरी करण्याचे प्रशिक्षण -
पाकिस्तानात परदेशी पाळीव प्राण्यांची मोठे मार्केट आहे. येथे, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, मदारी रस्त्यावरच माकडांचा खेळही करतात. याशिवाय माकडांना चोरी करण्याचे प्रशिक्षणही दिले जाते.
न्यायालयाने सुनावली अशी शिक्षा -
या माकडांच्या तस्करीप्रकरणी न्यायालयाने प्रत्येक तस्कराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला असून माकडांना कराची येथील प्राणिसंग्रहालयाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, माकडांना जेथून पकडले, तेथेच त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडायला हवे होते, असे मत अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.