मुलंच जन्माला येईनाशी होतात, तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 07:25 AM2023-09-04T07:25:03+5:302023-09-04T07:25:10+5:30
आई किंवा वडिलांपैकी एकाने काही काळासाठी नोकरी सोडणं, हेही परवडत नाही.
एकीकडे जग सतत वाढणाऱ्या लोकसंख्येच्या प्रश्नाला तोंड देण्यासाठी धडपड करत असताना जपानमधील जन्मदर मात्र काळजी वाटावी इतका खालावतो आहे. जपानमध्ये रोहतो फार्मास्युटिकल्स नावाच्या एका औषध कंपनीने नुकतंच एक सर्वेक्षण केलं. त्यात असं दिसून आलं, की तीस वर्षांखालील लग्न न केलेल्या अर्ध्या तरुणांना मुलं जन्माला घालण्यात स्वारस्य नाही.
जपान सरकारच्या अधिकृत सर्वेक्षणाच्या पाठोपाठ या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातदेखील याच प्रकारची माहिती हाती आली आहे. जपान सरकारच्या अधिकृत सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे, की २०२२ साली जपानमध्ये जन्माला आलेल्या एकूण बाळांची संख्या आठ लाखांपेक्षा कमी होती. म्हणजेच जपानच्या एकूण लोकसंख्येत २०२२ साली एकूण आठ लाखांपेक्षा कमी वाढ झाली आहे. जपान सरकारने या प्रकारच्या माहितीचे रेकॉर्ड ठेवायला १८९९ सालापासून सुरुवात केली होती. दरवर्षी एकूण किती बाळं जन्माला आली, याची नोंद सरकार दरबारी केली जाते. तेव्हापासून आत्तापर्यंत पहिल्यांदाच ही संख्या वर्षाला आठ लाखापेक्षा कमी नोंदवली गेली आहे.
जपानमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन अँड सोशल सिक्युरिटी रिसर्च या संस्थेमार्फत जन्म व मृत्यूची नोंद ठेवण्यात येते. या नोंदी सांगतात, जपानमधील जन्मदर गेली काही वर्षे सातत्याने घटतो आहे. २०१६ साली जपानमध्ये वर्षभरात जन्माला आलेल्या एकूण बाळांची संख्या पहिल्यांदा दहा लाखांपेक्षा कमी झाली. त्यानंतर दरवर्षी सातत्याने त्यात घट होते आहे. या संस्थेचे प्रमुख मिहो इवासावा म्हणतात, जपानमधील तरुण उशिरा लग्न करत आहेत. त्यामुळे ते मुलं जन्माला घालण्याचा निर्णय उशिरा घेतात. साहजिकच त्यांच्यापैकी अनेकांना एकच मूल पुरे असं वाटतं. त्याव्यतिरिक्त मुळात तरुण माणसांची संख्या कमी असल्याने ते कमी मुलांना जन्म देत आहेत, असंही एक दुष्टचक्र जपानमध्ये निर्माण झालं आहे.
जपानी सरकारव्यतिरिक्त या खासगी औषध कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात १८ ते २९ वर्षांचे तरुण व तरुणी सहभागी झाले होते. त्यापैकी ४९ टक्के लोकांनी सांगितलं, त्यांना मुलं जन्माला घालण्यात काहीही स्वारस्य नाही. त्यातही ५३ टक्के पुरुष आणि ४५.६ महिलांनी सांगितलं की, त्यांना आई-बाबा होण्यात रस नाही. असं वाटण्यामागे कारणं काय आहेत, याचा शोध घेतला असता प्रमुख दोन कारणं पुढे आली. त्यापैकी एक म्हणजे मुलं जन्माला घालणं आणि त्यांना वाढवणं, ही जपानमध्ये फार खर्चिक बाब आहे. दुसरं मकारण म्हणजे जपानच्या भवितव्याबद्दल तरुण मुलांना खात्री वाटत नाही. जिथे आपल्यालाच भविष्याची खात्री वाटत नाही, तिथे पुढची पिढी जन्माला घालण्याबद्दल जपानी तरुण विशेष उत्सुक नाहीत.
जपानमधील महागाईचं एक उदाहरण म्हणजे जपानी खासगी विद्यापीठांमधील फी १९७५ सालापासून २०२१ सालापर्यंत पाचपट वाढली आहे. जपानमधील पब्लिक युनिव्हर्सिटीजच्या फीमधील हीच वाढ एकोणीसपट इतकी प्रचंड आहे. साहजिकच लग्न केलेल्या जोडप्यांना असं वाटतं की, आपण एकच मूल जन्माला घातलं, तर आपण त्याचं संगोपन अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्याच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य तो पैसा खर्च करू शकतो. त्यातच जपानमधील एकूण महागाई लक्षात घेता केवळ एकाच्या पगारात घर चालवणं आता अशक्य झालं आहे. म्हणजेच मुलाच्या जन्मानंतर आई व वडील या दोघांनीही कमावणं गरजेचं आहे. मात्र, जपानमधील पाळणाघरांची व्यवस्थासुद्धा बऱ्यापैकी महाग आहे.
आई किंवा वडिलांपैकी एकाने काही काळासाठी नोकरी सोडणं, हेही परवडत नाही. याशिवाय जपानमधील सामाजिक व्यवस्थाही महिलांना मूल हवंसं वाटण्याच्या काही प्रमाणात आड येते. जपान हा पारंपरिक आणि त्यातही पितृसत्ताक पद्धतीने विचार करणारा देश असल्यामुळे जपानी आईवर घर सांभाळणे आणि बालसंगोपनाचा बहुतेक सगळा भर परंपरेने दिलेला असतो. मुलं आणि नोकरी यात होणारी ओढाताण नको असल्यानेही जपानी महिला मुलांचा विचार करणं पुढे ढकलतात किंवा टाळतात. कदाचित याच कारणाने जपानी महिला आता अधिकाधिक उशिरा लग्न करू लागल्या आहेत.
जपानी महिला तिशीत करतात लग्न!
जपानमधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन अँड सोशल सिक्युरिटी रिसर्चचा अभ्यास सांगतो, जपानी महिलांचं लग्न करण्याचं सरासरी वय आता २९.४ वर्षे एवढं आहे. हे वय १९८५ साली असलेल्या जपानी महिलांच्या लग्नाच्या सरासरी वयापेक्षा ३.९ वर्षे जास्त आहे. जपानची लोकसंख्या घटण्याचं नेमकं एकच कारण सांगता येत नसलं तरी २०२० साली १२६.५ दशलक्ष असलेली जपानची लोकसंख्या २०७० सालापर्यंत घटून ८७ दशलक्ष इतकी कमी होईल, असा अंदाज आहे.