मार्क झकरबर्ग प्रतिस्पर्ध्याला ‘लोळवतो’ तेव्हा..
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 07:58 AM2023-05-10T07:58:27+5:302023-05-10T08:02:15+5:30
फेसबुक आणि ‘मेटा’चा संस्थापक मार्क झकरबर्ग त्याच्या अफलातून आयडियांबद्दल, त्याच्या उद्यमशीलतेबद्दल, त्याच्या क्रिएटिव्हिटीबद्दल विशेष प्रसिद्ध आहे.
फेसबुक आणि ‘मेटा’चा संस्थापक मार्क झकरबर्ग त्याच्या अफलातून आयडियांबद्दल, त्याच्या उद्यमशीलतेबद्दल, त्याच्या क्रिएटिव्हिटीबद्दल विशेष प्रसिद्ध आहे. हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना वर्गमित्र डस्टिन मोस्कोविट्ज, एड्युअर्डो सार्विन आणि ख्रिस ह्युजेस यांच्यासह त्यानं फेसबुकची स्थापना केली. त्यानंतर त्यानं कधीच मागे वळून पाहिलं नाही. जगातला सगळ्यात लहान वयाचा अब्जाधीश अशीही झकरबर्गची ओळख आहे. जगातल्या सर्वांत प्रभावशाली व्यक्तींच्या आणि जगातील गर्भश्रीमंतांच्या यादीत तर त्याचं नाव नित्यनेमानं झळकत असतं, पण टेक टायकून मार्क झकरबर्गची ही झाली औपचारिक ओळख. ती जवळपास जगातल्या प्रत्येकाला माहीत आहे. पण या व्यतिरिक्तही मार्क अनेक गोष्टी करीत असतो. त्यातल्या बऱ्याच गोष्टी जगापासून, सर्वसामान्य लोकांपासून अज्ञात आहेत.
त्यातलीच एक गोष्ट म्हणजे मार्शल आर्ट्स! मार्क सध्या ३८ वर्षांचा आहे. पण या वयातही त्याचं चापल्य पाहण्यासारखं आहे. त्याला मार्शल आर्ट्सची केवळ आवड आहे, असं नव्हे, तर त्यातलं त्याचं कौशल्यही वाखाणण्यासारखं आहे. त्याची चुणूक त्यानं नुकतीच दाखवून दिली आहे. कॅलिफोर्निया येथे नुकत्याच झालेल्या ब्राझिलियन जिऊ जित्सू मार्शल आर्ट्स स्पर्धेत मार्कनं पहिल्यांदाच भाग घेतला आणि त्यात त्यानं चक्क गोल्ड आणि सिल्व्हर मेडल मिळवलं! मार्कनं स्वत:च त्याच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम हँडलवर ही माहिती जाहीर केल्यानंतर अख्खं जग आश्चर्यचकित झालं आणि मार्कच्या आणखी एका गुणाची सर्वांना प्रचिती आली.
मिक्स मार्शल आर्ट्स (एमएमए) या प्रकारात मार्क आता रातोरात सेलिब्रिटी बनला आहे. मार्कला सुरुवातीपासून खेळाविषयी आवड होतीच; पण त्याला ती फारशी जोपासता आली नव्हती. कोरोनाकाळात सगळं जग जणू ठप्प झालं असताना खेळ आणि त्यातही मार्शल आर्ट्सविषयीची त्याची आवड आणि ऊर्मी आणखीच उफाळून आली.
मार्कनं मार्शल आर्टकडे अतिशय गांभीर्यानं पाहायला सुरुवात केली आणि अतिशय कठोर मेहनत घेत त्याच्या सरावालाही सुरुवात केली. मार्शल आर्ट्सची मुळातच आवड असल्यानं त्याचे धडे गिरवायला आणि त्यात प्रभुत्व मिळवायला त्याला फारसे कष्ट पडले नाहीत. पण पहिल्याच स्पर्धेत आणि तेही भल्या भल्या स्पर्धकांना हरवत थेट गोल्ड मेडल आणि सिल्व्हर मेडलवर मार्क कब्जा करेल, असं खुद्द त्याच्या प्रशिक्षकांनाही वाटलं नव्हतं. अर्थात मार्क या स्पर्धेत चांगली कामगिरी करेल यावर त्यांचा विश्वास होता.
मार्कचे मार्शल आर्ट्सचे कोच खाई ऊर्फ ‘द शॅडो’ मार्कचं मनापासून अभिनंदन करताना म्हणतात, मार्क हा ‘सायलेंट किलर’ आहे. त्यानं अतिशय शिस्तीत आणि शांत डोक्यानं आपल्या प्रतिस्पर्ध्यांना ‘संपवलं’. माझ्या या शिष्याचा मला फार अभिमान आहे. ‘झुक’च्या (झकरबर्ग ) मॅचेस पाहताना एखादं महाकाव्य मी पाहतो आहे की काय, असा भास मला होत होता. त्याचा कोणताही आणि कोणाही प्रतिस्पर्ध्याविरुद्धचा सामना सोपा नव्हता. या स्पर्धेत त्यानं जे काही कमावलं, ती सारी त्याची ‘स्वकष्टार्जित कमाई’ आहे! मी झुकला काही सल्ला देऊ शकलो, हा मी माझाच बहुमान समजतो!
मार्कनं ‘मार्शल आर्ट्स चॅम्पियन’ ही जी नवी ओळख मिळवली आहे, त्याबद्दल संपूर्ण जगभरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. त्याच्या चाहत्यांसाठी तर ही अक्षरश: पर्वणी आहे. जगभरातील नामांकित ॲथलिट्स, खेळाडू, सेलिब्रिटींनीही याबाबत मार्कचं पोट भरून कौतुक केलं आहे. माजी यूएफसी (Ultimate Fighting Championship) चॅम्पियन कॉनर मॅकग्रेगर, पाच वेळेचा जागतिक जिऊ-जित्सू चॅम्पियन ब्राझीलचा बर्नार्डो फारिया, अमेरिकेचा टीव्ही होस्ट आणि तरुणाईच्या दिलों की धडकन मारिओ लोपेझ, जिओ जित्सूमध्ये ब्राऊन बेल्ट मिळविलेला अभिनेता अश्टन कुचर, पर्पल बेल्ट मिळवलेला अभिनेता जेसन स्टॅथम, कॉमेडियन रसेल ब्रांड.. यांच्यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी या नव्या खेळीबद्दल मार्कचं अभिनंदन करताना त्याचं वारेमाप कौतुकही केलं आहे.
संपत्ती घटत असताना मिळालेली ऊर्जा!
आपल्या या परफॉर्मन्सबद्दल खुद्द मार्कही खूप खुश आहे. मार्शल आर्ट्सच्या या नव्या आवडीबद्दल तो म्हणतो, ‘मार्शल आर्टमुळे माझ्यातलं चापल्य खूपच वाढलं, एवढंच नाही, ऑफिसमधल्या माझ्या दैनंदिन कामकाजातला परफॉर्मन्स खूपच सुधारला. कामातही मी ‘वाघ’ बनलो.’ शेअर बाजारातील चढउतारांमुळे यावर्षी त्याच्या एकूण संपत्तीत जवळपास निम्यानं म्हणजे ७१ अब्ज डॉलर्सनी घट झाली. अशा वेळी हा विजय मार्कला स्वत:ला आणि त्याच्या चाहत्यांनाही खूपच ऊर्जा देणारा ठरला आहे.