Taliban in Afghanistan : जेव्हा तालिबानने अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींना मारून विजेच्या खांबावर लटकवले होते
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 01:47 PM2021-08-16T13:47:33+5:302021-08-16T13:50:29+5:30
Taliban : याआधी १९९६ मध्ये जेव्हा तालिबानने काबुलवर ताबा मिळवला होता तेव्हा अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती नजीबुल्लाह (Najibullah) यांना मारून विजेच्या खांबाला लटकवण्यात आलं होतं.
तालिबानच्या (Taliban) सैन्यांनी आता अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबुलवर (Kabul) ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनीसहीत (Ashraf Ghani) इतर राजकीय नेते देश सोडून पळाले आहेत. अशात आता अफगाणिस्तानमध्ये दहशतीचं वातवरण आहे. भारत, कॅनडा, अमेरिकेसहीत अनेक यूरोपिय देशही अफगाणिस्तानमधील लोकांना विमानद्वारे बाहेर काढत आहेत. अशात याआधी १९९६ मध्ये जेव्हा तालिबानने काबुलवर ताबा मिळवला होता तेव्हा अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती नजीबुल्लाह (Najibullah) यांना मारून विजेच्या खांबाला लटकवण्यात आलं होतं.
तत्कालीन राष्ट्रपती नजीबुल्लाह पीपुल्स डेमोक्रेटिक पार्टीचे होते. हा पक्ष कम्युनिस्ट विचारधारेचा होता. जेव्हा पक्ष सत्तेत आला तेव्हा अफगाणिस्तानमध्ये अनेक प्रकारचे सामाजिक बदल आले होते. यात महिलांना त्यांचे अधिकार देण्यात आले होते. सोबतच धर्मनिरपेक्षतेबाबतही पाउल उचलण्यात आले होते.
पण हे सगळं करूनही या पक्षाच्या सरकारमध्ये नागरिकांसोबत चांगला व्यवहार झाला नाही. लोक वैतागले होते. अफगाणिस्तानमधील लोकांमध्ये सरकार विरोधात नाराजी वाढली होती. अशात सरकार विरोधात लढत असलेल्या विद्रोह्यांना स्थानिक लोकांचं समर्थन मिळू लागलं होतं. १९८७ मध्ये सोव्हिएत संघाच्या मदतीने नजीबुल्लाह अफगाणिस्तानचे राष्ट्रपती बनले होते. (हे पण वाचा : Afghanistan Taliban Crisis: अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे तालिबानी कोण आहेत? कुठून येतो पैसा आणि रसद?)
राष्ट्रपती बनल्यावर नजीबुल्लाह यांनी अफगाणिस्तानचं संविधान पुन्हा लिहून घेतलं होतं. सोबतच देशाचं नाव बदलून रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान ठेवलं होतं. डिसेंबर १९९१ मध्ये सोव्हिएत संघ संपला होता. यानंतर नजीबुल्लाह यांना मिळणारी सगळी मदत बंद झाली होती. नंतर नजीबुल्लाह आपला जीव वाचवण्यासाठी एका कंपाउंडमध्ये १९९६ पर्यंत लपून राहिले होते.
यादरम्यान अफगाणिस्तानमध्ये तालिबान वाढला होता. तेव्हा त्यांना पाकिस्तान आणि अमेरिकेकडून मदत मिळत होती. तालिबानने जेव्हा काबुलवर ताबा मिळवला तेव्हा नजीबुल्लाह यांना आपल्या सोबत येण्यास सांगितलं. पण त्यांनी सोबत येण्यास नकार दिला होता. यानंतर तालिबानने त्यांचा जीव घेतला आणि काबुलच्या आरियाना चौकात त्यांचा मृतदेह एका विजेच्या खांबाला लटकवला होता.
त्यांची जीव घेण्याआधी त्यांना एका ट्रकच्या मागे बांधून फरफटत नेण्यात आलं होतं. तालिबान्यांनी त्यांच्या डोक्यात गोळी मारली होती. ज्या खांबावर त्यांना लटकवण्यात आलं होतं त्याच खांबावर त्यांचा भाऊ शाहपूर अहमदजाईचा मृतदेह लटकवण्यात आला होता.