निर्मनुष्य शहराच्या भिंती जेव्हा बोलू लागतात..

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 01:55 AM2020-11-23T01:55:22+5:302020-11-23T01:55:44+5:30

फुटाबाला सुंदर करण्याच्या टाकासाकी आणि अकाझावा यांच्या या प्रयत्नांना आता लोकही दाद देऊ लागले आहेत. या दोघांच्या प्रयत्नांतून फुटाबा शहरातल्या सगळ्या भिंती आशादायक चित्रांनी बोलू लागल्या आहेत

When the walls of a desolate city begin to speak .. | निर्मनुष्य शहराच्या भिंती जेव्हा बोलू लागतात..

निर्मनुष्य शहराच्या भिंती जेव्हा बोलू लागतात..

Next

२०११ मध्ये जपानच्या फुकुशिमा येथील  आण्विक प्रकल्पात अपघात झाला,  किरणोत्सर्गामुळे एक हसतं खेळतं, माणसांनी गजबजलेलं शहर ओस पडलं. विद्रुप झालं. फुटाबा हा फुकुशिमातला एक प्रांत. तोही या अपघातात उजाड झाला. गेल्या दहा वर्षांपासून   ‘भुताचं शहर’ हीच या शहराची ओळख बनली आहे; पण या शहराचा चेहरा आता बदलतोय. आण्विक अपघातानं कुरूपतेचे ओरखडे उमटलेल्या या शहराच्या चेहर्‍यावर सौंदर्याचं हसू उमलत आहे. फुटाबा शहरात जो टाकासाकी नावाचे गृहस्थ राहायचे. ते आता टोक्योमध्ये ‘इझाकया’ नावाचा एक पब चालवतात.  त्यांचा जीव  फुटावा शहरातच अडकलेला. टाकासाकी यांच्या मनातली ही वेदनाच फुटावाच्या भविष्यातल्या सौंदर्याचा उगम ठरली आहे. टाकासाकी एकदा नेदरलॅण्डमधील अँमस्टरडॅम येथे गेले होते. तेथे त्यांनी उद‌्ध्वस्त झालेल्या शिपयार्डला दिलेलं नवं कलात्मक रूप बघितलं. कलेच्या स्पर्शाने सजलेली शिपयार्ड पाहायला जमलेली गर्दी बघितली. तेव्हा टाकासाकी यांना वाटलं, आपलं शहरही या शिपयार्डसारखं बदललं तर..?

पण हे सर्व जर तरच होतं; पण टाकासाकी यांच्या या उमेदीला कृतीचे पंख फुटले ते टाकाटो अकाझावा या व्यक्तीशी भेट झाल्यानंतर. २०१९ मध्ये एके दिवशी टाकासाकींना  त्यांच्या पबवरच अकाझावा भेटले. या अकाझावा यांची ‘ओव्हर ऑल को डॉट’ नावाची भित्तिचित्र कलेची कंपनी आहे. अकाझावा यांना जपानमध्ये स्थानिक कलेच्या साहाय्यानं एक कलात्मक शहर उभं करायची इच्छा होतीच. त्या दिवशी पबमध्ये अकाझावा आपल्या या स्वप्नरबद्दल कोणाशी तरी बोलत असताना टाकासाकींनी ऐकलं आणि जराही वेळ न दवडता  फुटाबा शहराबद्दलची इच्छा बोलून दाखवली. ‘माझ्या फुटाबा शहरात तुम्ही हे काम करा’ असा प्रस्ताव अकाझावासमोर मांडला. किरणोत्सर्गाच्या भीतीमुळे सुरुवातीला त्यांनी नकार दिला खरा; पण  टाकासाकींच्या मनातली कळकळ बघून अकाझावा तयार झाले.
युकी यामामोटो या चित्रकारासोबत अकाझावा फुटाबा शहरात आले. आतापर्यंत फक्त टीव्हीवर बघितलेली विध्वंसाची दृश्य त्यांना प्रत्यक्षात पाहायला मिळाली. दूषित माती वाहून नेण्यासाठी लागलेल्या ट्रकच्या रांगा, जागोजागी उभे असलेले प्रतिबंधित क्षेत्राचे फलक, ओसाड जागांवर उगवलेलं गवत आणि बरंच काही. या पार्श्वभूमीवर आपलं काम सुरू करण्यासाठी अकाझावा यांनी शेक्सपिअर यांच्या रोमिओ-ज्युलिएट या शोकांतिकेचा आधार घेतला.  सुरक्षा जॅकेट घातलेला रोमिओ बाल्कनीत उभ्या असलेल्या ज्युलिएटला भेटायला येतो.  फुटाबा शहरातील किरणोत्साराची पातळी खाली आल्याचं दाखवणारा एक मापन-बार या दोघांमध्ये आहे. त्यामुळेच निर्धास्त झालेले रोमिओ-ज्युलिएट  एकमेकांना टाळी देत आहेत’ असं एक  भित्तिचित्र फुटावात काढायचं ठरवलं. ते चित्रं पूर्ण झाल्यावर अकाझावा  टोक्योला जायला निघाले, तर त्यांचं लक्ष  रेल्वे स्टेशनसमोरच्या छोट्या भिंतीकडे गेलं. ती भिंत डोक्यात ठेवून ते टोक्योला गेले. दोन दिवसांनी परतले, ते नवी कल्पना घेऊनच! रेल्वे स्टेशनजवळच्या त्या भिंतीपलीकडेच टाकासाकी यांचं घर होतं. तिथेच टाकासाकी यांचे वडील एक हॉटेल चालवायचे. आण्विक  अपघातात पडीक झालेल्या या भिंतीवर अकाझावा यांनी एक हात चितारला. हा हात जमिनीच्या दिशेनं निर्देश करत ‘हिअर वुई गो’ असं सांगत असल्याचं त्यांनी दाखवलं. 

फुटाबाला सुंदर करण्याच्या टाकासाकी आणि अकाझावा यांच्या या प्रयत्नांना आता लोकही दाद देऊ लागले आहेत. या दोघांच्या प्रयत्नांतून फुटाबा शहरातल्या सगळ्या भिंती आशादायक चित्रांनी बोलू लागल्या आहेत. नुकतंच पूर्ण झालेलं एक चित्र आहे ७५ वर्षीय टाकाको योशिदा नावाच्या महिलेचं. फुटावा शहरात ही महिला ‘पेंग्विन’नावाचं एक छोटं हॉटेल चालवायची. या हॉटेलवर फुटाबा शहरातल्या लोकांचा विशेषत: शाळा, कॉलेजात जाणार्‍या मुलांचा भारी जीव.  फुटाबा शहरातला टाकाकोचा हा प्रेमळ चेहरा भिंतीवर चितारताना अकाझावांनी उगवत्या भविष्याकडे पाहण्याची नजर लोकांना दिली आहे. उगवत्या सूर्याची लाली हसतमुख टाकाकोच्या चेहर्‍यावर पसरली असून, ती डोनटच्या छिद्रातून बघत असल्याचं या सुंदर चित्रात दाखवलं आहे. पाहता पाहता या शहराचा चेहरा बदलू लागला आहे. जो टाकासाकींना फुटाबा  पुन्हा नव्यानं उभं राहाताना बघायचं आहे. आण्विक अपघातात आपल्या शहरानं खूप काही गमावलं; पण  फुटाबा नव्यानं उभं राहिलं तर या उद‌्ध्वस्त शहराकडे पाहण्याची लोकांची नजर नक्की बदलेल ही आशा टाकासाकी यांना आहे. 

Web Title: When the walls of a desolate city begin to speak ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Japanजपान