जगात कुठून आला कोरोना व्हायरस? वैज्ञानिकांना मिळाला मोठा पुरावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 04:17 PM2020-04-23T16:17:30+5:302020-04-23T16:29:45+5:30
यासंदर्भात बोलताना, अमेरिकेच्या यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील संशोधक म्हणाले, कोरोना व्हायरस आणि गेल्या दशकात आलेल्या सर्व संक्रमक आजारांचा संबंध वन्य जिवांशी आहे.
लॉस एंजिलिस : जगात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीसंदर्भात अनेक अंदाज बांधले जात असतानाच, एक महत्वाची माहिती अमेरिकेतील वैज्ञानिकांच्या हाती लागली आहे. अमेरिकेतील वैज्ञानिकांच्या मते, कोरोना व्हायरस सर्वप्रथम वन्य प्राण्यांमध्ये तयार झाला आणि नंतर मानवाला त्याचा संसर्ग झाला. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. आतापर्यंत 1,84,280हून अधिक लोकांचा त्याने बळी घेतला आहे. एवढेच नाही, तर त्याच्यामुळे जगातील अर्ध्या लोकांवर लॉकडाऊनमुळे घरातच कैद होण्याची वेळ आली आहे.
यासंदर्भात बोलताना, अमेरिकेच्या यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील संशोधक म्हणाले, कोरोना व्हायरस आणि गेल्या दशकात आलेल्या सर्व संक्रमक आजारांचा संबंध वन्य जिवांशी आहे. विद्यापीठाचे प्राध्यापक पाउला कॅनन म्हणाले, की 'आपण आशी परिस्थिती निर्माण केली, की हे सर्व काही वेळातच घडले. असेच काही वेळाने दुसऱ्यांदा पुन्हा होईल.' मात्र, सध्या झालेले संक्रमण कसे झाले, हे अद्याप वैज्ञानिकांना समजलेले नाही. पण, कोरोना व्हायरस घोड्याच्या नालेच्या आकारासारख्या दिसणाऱ्या वटवाघळामुळे पसरला, असे त्यांचे म्हणणे आहे.
कॅनन म्हणाले, कोरोना व्हायरस वटवाघळामुळेच मानवात पसरल्याचे पुरेसे पुरावे आहेत. या संशोधकांनी म्हटले आहे, की चीनच्या वुहान शहरातील एका बाजारातून हा व्हायरस मानवात पसरला. या बाजारात जिवंत प्राण्यांची विक्री केली जात होती. काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे मर्स आणि सार्स व्हायरसदेखील पसरले होते.
मर्स व्हायरस वटवाघळांपासून ऊंटांमद्ये आणि नंतर माणसांमध्ये पसरला. याचे पुरावेही आहेत. तसेच सार्स व्हायरसदेखील सर्वप्रथम वटवाघळातून मांजरांमध्ये आणि नंतर माणसांमध्ये पसरला, असे मानले जाते. याशिवाय इबोला व्हायरसदेखील वटवाघळातूनच माणसात आला. इबोला हा 1976, 2014 आणि 2016मध्ये आफ्रिकेत पसरला होता. तसेच आम्हाला कोरोना व्हायरसचे, असे काही जेनेटिक कोड मिळाले आहेत, जे वटवाघळांमध्ये आढलून येतात, असेही या वैज्ञानिकांनी म्हटले आहे.