५ राफेल असो अथवा ५००, आम्ही तयार; पाक मेजरची भारताला पोकळ धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 02:49 PM2020-08-14T14:49:29+5:302020-08-14T14:57:27+5:30
पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी सांगितले की, भारताकडे राफेल असो वा एस ४००..कोणत्याही आक्रमणाला तोंड देण्यासाठी पाकिस्तानी सैन्य पूर्णपणे तयारीत आहे.
नवी दिल्ली - अलीकडेच भारताने फ्रान्सकडून घेतलेले राफेल विमान देशात पोहचले आहेत. त्यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, राफेल भारतात आल्याची चिंता त्या देशांना वाटली पाहिजे जे भारताच्या अखंडतेला आव्हान देण्याचं काम करतात. गुरुवारी पाकिस्तानी सेनेने सांगितलं की भारताने ५ राफेल आणू द्या अथवा ५०० आम्हाला फरक पडत नाही, आम्ही तयार आहोत असं म्हटलं.
पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी सांगितले की, भारताकडे राफेल असो वा एस ४००..कोणत्याही आक्रमणाला तोंड देण्यासाठी पाकिस्तानी सैन्य पूर्णपणे तयारीत आहे. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यात त्यांना राफेल, भारताचं वाढते सुरक्षा बजेट, काश्मीर, सीमोल्लंघन आणि पाक-सौदी अरबच्या संबधांवर पत्रकारांनी प्रश्न विचारले होते. यात मेजर जनरल इफ्तिखार म्हणाले, भारताच्या वाढता लष्करी खर्च आणि संरक्षण बजेटबद्दल पाकिस्तान चिंताग्रस्त आहे, पण कोणत्याही प्रकारच्या आक्रमणासाठी तयार आहे.
राफेलमुळे पाकिस्तानला निर्माण झालेल्या धोक्याशी संबंधित प्रश्नावर मेजर जनरल इफ्तिखार म्हणाले, सैन्यावर भारत जगात सर्वाधिक खर्च करीत आहे. तो शस्त्रांच्या शर्यतीत सहभाही आहे. मात्र फ्रान्स ते भारत यामध्ये पाच मार्गांचा प्रवास ज्या प्रकारे झाला होता त्यावरून त्यांची असुरक्षितता दिसून येते. त्यांनी पाच राफेल खरेदी केले किंवा ५०० याची पर्वा करत नाही, आम्ही तयार आहोत आणि आम्हाला आमच्या क्षमतेविषयी शंका नाही. राफेल येण्याने काही फरक पडणार नाही असं त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मेजर जनरल इफ्तिखार यांनीही पाकिस्तानच्या ढासळत्या आणि भारताच्या वाढत्या संरक्षण अर्थसंकल्पाबद्दल चिंता व्यक्त केली.
आमच्या तुलनेत भारताचा संरक्षण खर्च आणि अर्थसंकल्प हा पारंपारिक समतोलच्या विरुद्ध आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानेही याकडे लक्ष दिले पाहिजे. पाकिस्तानमधील बरेच लोक म्हणतात की, पाकिस्तानचे संरक्षण बजेट खूप जास्त आहे. यावेळी आम्ही बजेटचा १७ टक्के हिस्सा सैन्य, नौदल आणि हवाई दलावर खर्च करीत आहोत. आणि गेल्या १० वर्षांत पाकिस्तानचा संरक्षण खर्च सातत्याने कमी होत आहे. असे असूनही आमच्या क्षमता कमी झाल्या नाहीत. त्यामुळे राफेल आणू द्या किंवा एस -४०० आमची तयारी पूर्ण आहे असं मेजर जनरल इफ्तिखार यांनी सांगितले.
DG ISPR Press Conference - 13 August 2020 https://t.co/6T5mOK1CMn
— DG ISPR (@OfficialDGISPR) August 13, 2020
काश्मीरवर निशाणा
मेजर जनरल इफ्तिखार यांनी पत्रकार परिषदेच्या सुरूवातीला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना काश्मीरवरुन भारताला लक्ष्य केले. भारत नियोजित पद्धतीने या प्रदेशातील लोकसंख्या बदलून तेथील स्थानिक मुस्लिमांना हटवायचे आहे. असा कोणताही छळ काश्मिरींनी अनुभवलेले नाही. तरुण शहीद होत आहेत आणि त्यांना दहशतवादाच्या नावाखाली पुरण्यात आले आहे. भारतीय सैन्याने कश्मीरींना पेलेट गनने लक्ष्य केले आहे. यावेळी स्थानिक नेतृत्वाला एका वर्षासाठी कोठडीत ठेवण्यात आले आहे. काश्मिरींचा प्रश्न संपूर्ण जगासमोर ठेवण्यात पाकिस्तानने कसलीही कसर सोडली नाही असं इफ्तिखार यांनी सांगितले.
सीमेवरील शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याचा आरोप
कोरोना महामारीदरम्यान संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सरचिटणीसांचे आवाहन असूनही भारताने पारंपारिक भ्याड कृत्ये सुरूच ठेवली आणि निरपराध लोकांना लक्ष्य केले. जड शस्त्रे देखील वापरली जातात. सीमा उल्लंघनाला पाकिस्तानी सैन्य देखील प्रभावीपणे उत्तर देत आहे. त्यांनी भारतावर वंशवाद आणि जातीयवाद पसरवल्याचा आरोपही केला. ते म्हणाले की, जातीय द्वेषाची आग पेटवण्यास भारताने सुरुवात केली आणि ती देशभर पसरली असं ते म्हणाले.