कोणत्या देशात कसा दिला जातो देहदंड?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 06:17 AM2021-04-30T06:17:52+5:302021-04-30T06:20:10+5:30
विविध देशांत मृत्युदंड देण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत.
कोरोना काळात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी नाही. जगभरात लाखोच्या संख्येने लोक मृत्यूच्या दाढेत ढकलले जात आहेत. असा एकही देश नाही, जिथे कोरोनाने मृत्यू घडले नाहीत; पण जगात तीन देश असे आहेत, जिथे मृत्युदंड दिल्याने मरणाऱ्यांची संख्याही कमी नाही. हे तीन देश आहेत, सौदी अरेबिया, इजिप्त आणि इराक. अर्थात चीनमध्ये फाशी दिल्या जाणाऱ्या लोकांची संख्या दरवर्षी सर्वाधिक, काही हजारांच्या घरात असते. त्यातही खरी आकडेवारी कोणालाच कळत नाही आणि या वर्षी तर कोरोना महामारीच्या बहाण्यानं ‘स्टेट सिक्रेट’च्या नावाखाली ‘खरी-खोटी’ माहितीही चीननं जाहीर केलेली नाही.
ॲम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार, जगभरात गेल्या वर्षी २०२० मध्ये अनेक गुन्हेगारांना देहदंड देण्यात आला. त्यातल्या पाच प्रमुख देशांपैकी चार देश मध्य-पूर्वेतले आहेत. ॲम्नेस्टी इंटरनॅशनलने बुधवारी जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे, की २०१९ मध्ये मध्य-पूर्व आणि आफ्रिकेत ५७९ जणांना मृत्युदंड देण्यात आला. २०२० मध्ये हा आकडा थोडा घटून ४८३ झाला असला, तरी त्यात चीनची आकडेवारी नाही. तिथे दरवर्षी हजारो लोकांना मृत्युदंड दिला जातो. या वर्षीही सौदी अरेबिया आणि इराक या देशांत थोड्या कमी प्रमाणात मृत्युदंड दिले गेल्यामुळे ही संख्या थोडी घटली आहे. मृत्युदंड मिळालेल्यांची या दशकातील ही सर्वांत कमी संख्या आहे.
विविध देशांत मृत्युदंड देण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. त्यातल्या काही तर अतिशय क्रूर म्हटल्या जातील अशा आहेत. काही ठिकाणी मृत्युदंडासाठी एकापेक्षा जास्त पद्धती वापरल्या जातात. जगात ५८ देशांत मृत्युदंडासाठी फाशीची पद्धत वापरली जाते, तर सर्वाधिक ७३ देशांत दोषींना गोळी मारून आयुष्य संपवलं जातं. या ७३ पैकी ४५ देशांमध्ये अपराध्याला फायरिंग स्क्वॉडच्या समोर उभं केलं जातं आणि शिक्षेची अंमलबजावणी केली जाते. भारतासहित ३३ देशांमध्ये अपराध्याला मृत्युदंड देण्यासाठी ‘फाशी’ ही एकमात्र पद्धत वापरली जाते. जगातले सहा देश असे आहेत, जिथे अपराध्याला दगड मारून मृत्युदंड दिला जातो. हे सर्व देश कट्टर इस्लामिक आहेत.
पाच देश असे आहेत, जिथे गुन्हेगाराला मृत्युदंड देण्यासाठी विषारी इंजेक्शनचा वापर केला जातो. जगातले तीन देश तर असे आहेत, जिथे गुन्हेगाराचं थेट शीरच तलवारीनं धडावेगळं केलं जातं. त्यात सौदी अरेबियाचा समावेश आहे. अर्थातच हा मृत्युदंड जाहीरपणे दिला जातो आणि ते पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दीही होते. सौदी अरेबियात २०१९ मध्ये एकाच दिवशी ३७ लोकांचं शीर धडावेगळं करून त्यांना मृत्युदंड देण्यात आला होता. अर्थातच राष्ट्रद्रोह किंवा आतंकवाद, दहशतवादासारख्या अतिशय भयानक आणि गंभीर गुन्ह्यांतच ही सजा दिली जाते. इंडोनेशिया, चीन, टोगो, तुर्कमेनिस्तान, थायलंड, उत्तर कोरिया, बहारीन, येमेन, तैवान, अमेरिका, घाना, चिली, कॅमेरुन, बांगलादेश, सीरिया, आर्मेनिया, कुवेत, युगांडा, इजिप्त, इराण इत्यादी देशांमध्ये अपराध्यांना गोळी मारून मृत्युदंड दिला जातो.
मात्र त्याच वेळी जगातले ९७ देश असे आहेत, जिथे मृत्युदंडाची शिक्षाच नाही. हा कायदाच तिथे रद्द करण्यात आला आहे. कोणीही, कितीही मोठा गुन्हा केला तरी जगण्याचा त्याचा हक्क नाकारला जात नाही. मात्र त्याला वर्षानुवर्षे तुरुंगात खितपत पडावं लागतं. ॲम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार यंदा बऱ्याच देशांत मृत्युदंड देण्याच्या संख्येत घट झाली आहे. २०१९ च्या तुलनेत इजिप्तमध्ये २०२० मध्ये मृत्युदंडात तब्बल तीनशे टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचवेळी या शिक्षेत सौदी अरेबियातही ८५ टक्क्यांनी घट झाली आहे. सौदी अरेबियात २०२० मध्ये २७ लोकांना देहान्ताची शिक्षा देण्यात आली. इराकमध्येही २०१९ च्या तुलनेत देहान्ताची शिक्षा पन्नास टक्क्यांनी कमी झाली आहे. २०२० या वर्षी इराकमध्ये ४५ लोकांना देहदंडाची शिक्षा देण्यात आली.
२०२० मध्ये ज्या ४८३ अपराध्यांना देहदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली, त्यात १६ महिलांचाही समावेश आहे. त्यात इजिप्तमध्ये चार, इराणमध्ये नऊ, ओमानमध्ये एक तर सौदी अरेबियातील दोन महिलांचा समावेश आहे. २०१८ आणि २०१९ मध्ये बेलारुस, जपान, पाकिस्तान, सिंगापूर, सुदान आणि बहारीन या देशांत देहदंडाची शिक्षा देण्यात आली असली तरी २०२० या वर्षी मात्र या देशांत एकालाही देहान्ताची सजा देण्यात आली नाही. चाड या देशाने मे २०२० मध्ये देहदंडाची शिक्षा रद्द केली, तर कझाकस्ताननेही यादृष्टीने पावले उचलली आहेत.