मेक्सिकोमध्ये लोक जेवत होते, तितक्यात चर्चचे छत कोसळले; 10 जणांचा मृत्यू, ६० जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 06:51 PM2023-10-02T18:51:55+5:302023-10-02T18:52:02+5:30
तमुलिपास पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले की, छत कोसळले त्यावेळी चर्चमध्ये १०० हून अधिक लोक जमलेले होते.
मेक्सिकोमध्ये रविवारी मोठी दुर्घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास एका चर्चचे छत कोसळल्याने १० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. याचबरोबर छताच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 30 लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
तमुलिपास पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले की, छत कोसळले त्यावेळी चर्चमध्ये १०० हून अधिक लोक जमलेले होते. पोलिसांनी सांगितले की, पोलीस, रेड क्रॉसचे लोक घटनास्थळी मदतकार्य करत आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये एका चार महिन्यांचे बालकही आहे. तसेच पाच वर्षांचे तीन आणि नऊ वर्षांची दोन मुले आहेत.
टॅम्पिको शहरातील सिउदाद माडेरो येथील सांताक्रूझ चर्चमध्ये काही लोक जेवत होते. त्यावेळी चर्चचे छत त्यांच्यावर कोसळले असे रोमन कॅथोलिक चर्चचे बिशप जोस अरमांडो अल्वारेझ यांनी सांगितले.
स्ट्रक्चरल फॉल्टमुळे ही दुर्घटना झाल्याचे राज्य सुरक्षा प्रवक्त्याने सांगितले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ६० पैकी २३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भूकंप दरम्यान इमारती कोसळणे मेक्सिकोमध्ये सामान्य बनले आहे. परंतू, या दुर्घटनेवेळी भूकंप झाला नव्हता असे राष्ट्रीय भूकंप विज्ञान सेवेने म्हटले आहे.