WHO कडून Novavax च्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या वापरास मंजुरी; ठरली दहावी लस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 12:12 PM2021-12-22T12:12:27+5:302021-12-22T12:12:51+5:30
Novavax Coronavirus Vaccine : जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) लसीच्या आपात्कालिन वापरास दिली मंजुरी.
जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) मंगळवारी अमेरिकन फार्मा कंपनी नोव्हावॅक्सने तयार केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या (Covid-19 Vaccine) आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली. यापूर्वी, युरोपियन युनियनच्या औषध नियामकाने सोमवारी नुवाक्सोविडला (Nuvaxovid) मान्यता दिली होती.
नुवाक्सोविड हे पूर्वी मंजूर केलेल्या औषधांपेक्षा अधिक पारंपारिक तंत्रज्ञानाने बनवले गेले आहे. ज्या लोकांनी लस घेण्यास असमर्थता दर्शवली होती त्यांच्या मनातील विचार या लसीनंतर दूर होतील असा विश्वास ब्रेसेल्समधील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या कोरोना प्रतिबंधात्मक लसीमध्ये एका पारंपारिक तंत्राचा वापर करण्यात आला आहे, ज्यामध्ये केवळ कोरोनाव्हायरसमध्ये आढळणारे प्रोटिनच संरक्षणासाठी तयार करणाऱ्या प्रोटिनला ट्रिगर करतील. डांग्या खोकला आणि हिपॅटायटीस बी सारख्या आजारांपासून लोकांना लसीकरण करताना ही एक प्रयोग केलेली आणि चाचणी केलेली पद्धत आहे.
WHO च्या आपत्कालीन वापर सूचीमुळे (Emergency Use Listing) आता जगभरातील देश लवकरच या लसीचा वापर आणि आयात करण्यास परवानगी देऊ शकतील. जागतिक आरोग्य संघटनेनं मंजुरी दिलेली कोरोना प्रतिबंधात्मक १० वी लस नुवाक्सोविड दोन डोसमध्ये दिली जाईल. आधीच मंजूर केलेल्या औषधांमध्ये कोवोव्हॅक्सचा समावेश आहे, जे नोव्हावॅक्स लसीचंच व्हर्जनआहे. अमेरिकन कंपनीच्या परवान्याखाली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने या लसीचं उत्पादन केलं आहे. १७ डिसेंबर रोजी त्यास मान्यता देण्यात आली.
दरम्यान, नुवाक्सोविड ही लस ९० टक्के प्रभावी असल्याचंही चाचणीतून समोर आलं आहे. याशिवाय ही लस १८ वर्षांवरील व्यक्तींनाच देण्यात येणार असून दोन डोसमधील अंतर तीन ते चार आठवड्यांपेक्षा कमी असू नये असाही सल्ला देण्यात आलाय.