चीनच्या अजस्त्र भिंतीला भगदाड कुणी पाडलं?; कधीही भरून न येणारं नुकसान झालं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 10:14 AM2023-09-19T10:14:44+5:302023-09-20T07:39:29+5:30
द ग्रेट वॉल ऑफ चायना’ म्हणजेच चीनच्या भिंतीचे दगड काढले तर ? योयू काऊंटी सिक्युरिटी पोलिस ब्यूरोला त्यांच्या भागातील भिंतीला मोठ्ठच्या मोठ्ठं भगदाड पडलेलं दिसलं.
शॉर्टकट मारणे हा माणसाचा स्थायीभाव आहे. अगदी शाळेत असताना मित्राच्या वहीत बघून पटापट गृहपाठ उतरवून काढण्यापासून ते कॉलेजमध्ये संपूर्ण प्रोजेक्ट डाऊनलोड करून त्यावर स्वतः चं नाव घालून सबमिट करणं, गल्लीबोळातले रस्ते शोधणं इथपासून ते सरळ रस्ता सोडून भिंतींवरून उडी मारून घरी जाण्यापर्यंत अनेक शॉर्टकट्स बहुतेकांनी कधी ना कधी मारलेले असतात. काही महाभाग हा शॉर्टकट मिळावा म्हणून इतरांच्या कुंपणाच्या तारा वाकवतात. इतरांच्या भिंतींचे दगड काढून त्यातून जायला जागा करतात. पण, असा शॉर्टकट मारण्यासाठी कोणी ‘ द ग्रेट वॉल ऑफ चायना’ म्हणजेच चीनच्या भिंतीचे दगड काढले तर ? योयू काऊंटी सिक्युरिटी पोलिस ब्यूरोला त्यांच्या भागातील भिंतीला मोठ्ठच्या मोठ्ठं भगदाड पडलेलं दिसलं. आता इतर कुठल्या भिंतीला भगदाड पडणं आणि चीनच्या भिंतीला भगदाड पडणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
चीनच्या भिंतीला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे. चीनची ही भिंत बांधण्याचं काम सुरू झालं ते इसवीसन पूर्व २२० साली. त्या काळी चीनच्या उत्तर भागात असलेल्या प्रांतावर सतत हल्ले होत असत. हे हल्ले थांबवण्यासाठी चीनच्या त्या भागात काही ठिकाणी लहान मोठ्या भिंती बांधलेल्या होत्या. मात्र इ. स. पूर्व २२० साली किन शी हुआंग याने त्या सगळ्या भिंती ऐकमेकींना जोडून एक सलग भिंत बांधायला सुरुवात केली. हे काम अर्थातच सोपं नव्हतं. पण, उत्तरेकडून सतत होणारे हल्ले थांबवण्यासाठी त्यावेळी त्याच्यासमोर दुसरा काही पर्यायही नव्हता. त्यामुळे जरी त्या बांधकामाला ‘चीनची भिंत’ असं म्हणत असले, तरीही ती काही एक सलग बांधलेली भिंत नाही. या भिंतीमध्ये बुरुज, सैनिकांनी राहण्यासाठी बांधलेल्या बरॅक्स, सैन्याचे तळ आणि काही लहानमोठे किल्लेही आहेत. याच कारणाने ही संपूर्ण भिंत कुठलंही एक बांधकाम साहित्य वापरून बांधलेली नाही. यात विटा, दगड कापून बनवलेले ठोकळे, चुनखडीचे दगड इतकंच नाही तर, मिळाले तसे ओबडधोबड दगड आणि लाकूड याचाही वापर काही ठिकाणी केलेला आहे.
अर्थात या चीनच्या भिंतीची एकूण लांबी बघितली, तर लक्षात येतं की, ती किती प्रचंड मोठी आहे. या भिंतीची एकूण लांबी तब्बल २१,१९६ किलोमीटर्स इतकी प्रचंड आहे. ही भिंत बांधायला २००० हून अधिक वर्षे लागली. साहजिकच ही भिंत हा चीनचा सांस्कृतिक मानबिंदू समजली जाते. या ऐतिहासिक भिंतीला कोणीतरी भगदाड पाडलं आहे हे लक्षात आल्यावर साहजिकच योयू काऊंटी सिक्युरिटी पोलिस ब्यूरोने त्याचा तपास करायला सुरुवात केली. बरं हे भगदाड पाडलं होतं, ते काही एखाद्या माणसाला ती भिंत ओलांडून जाता येईल इतकं लहान नव्हतं, तर रस्ते बांधण्यासाठी वापरण्यात येणारी मोठी यंत्रसामुग्री, एक्स कॅव्हेटर वगैरे वापरून या भिंतीला खिंडार पाडण्यात आलं होतं. हे लक्षात आल्यावर तिथल्या पोलिसांनी या एक्स कॅव्हेटरचा माग काढला आणि ते जवळच्या एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पोचले. तिथून त्यांनी एका ३८ वर्षांच्या पुरुषाला आणि ५५ वर्षांच्या स्त्रीला अटक केली आहे. त्यांनी भिंतीला भगदाड पाडून तिथून त्यांच्या कामाच्या ठिकाणी मशिनरी आणि इतर सामानाची वाहतूक करण्यासाठी शॉर्टकट तयार केला असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी हे खिंडार पाडलं, तिथून जाण्यायेण्यासाठी आधी लहान रस्ता होता, मात्र या दोघांनी तो मोठा करण्यासाठी भिंतीचा काही भागच पाडून टाकला होता.
त्या दोघांनी ज्या पद्धतीने हे खिंडार पाडलं आहे त्यामुळे चीनच्या भिंतीचं आणि एकूणच चीनच्या सांस्कृतिक ठेव्याचं कधीही भरून न येणारं नुकसान झालं आहे, असा आरोप पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला आहे. इ. स. पूर्व २२० साली बांधकाम सुरू झालेली ही भिंत मिंग राजघराण्याने १६४४ साली बांधून पूर्ण केली. या संपूर्ण काळात या भिंतीवर अनेक हल्ले झाले. हा शॉर्टकट तयार करण्यासाठीचा हल्ला हा त्यातील सगळ्यात लेटेस्ट हल्ला आहे, असंही म्हणता येऊ शकेल.
लेडी मेंगजिआंग आणि तिचा नवरा
चीनची भिंत बांधताना ज्या काही घटना घडल्या त्यामुळे त्या भिंतीशी संबंधित अनेक दंतकथा चीनमध्ये प्रचलित आहेत. त्यापैकी एक चीनमधली प्राचीन प्रेमकथा आहे. असं म्हणतात, लेडी मेंगजिआंगच्या नवऱ्याला ही भिंत बांधण्याच्या कामी रुजू होण्याचा आदेश देण्यात आला. त्याप्रमाणे तो गेला खरा, पण त्यानंतर त्याच्याकडून कुठलाच निरोप आला नाही. जसे थंडीचे दिवस जवळ आले, तशी लेडी मेंगजिआंग नवऱ्यासाठी उबदार कपडे घेऊन निघाली. मात्र तिथे पोचल्यावर तिला समजलं की, तिच्या नवऱ्याचा पूर्वीच मृत्यू झाला आहे. ही बातमी ऐकून तिने इतका जास्त शोक केला की, त्यामुळे भिंतीचा काही भाग कोसळला.