निज्जरवर कॅनडाला इनपुट देणारा कोण, अमेरिका भारतासोबत खेळतोय का डबल गेम?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 12:17 PM2023-09-23T12:17:58+5:302023-09-23T12:18:26+5:30
दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारतीय एजंट्सचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला होता.
दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारतीय एजंट्सचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला. यानंतर कॅनडावर यासंबंधीचे पुरावे देण्याचा दबाव सातत्याने वाढत आहे. अशातच काही मीडिया रिपोर्ट्स समोर आले आहेत. यामध्ये कॅनडाकडे भारतीय अधिकाऱ्यांच्या संवादाशी संबंधित पुरावे असल्याचे सांगण्यात आलेय. फाइव्ह आईज (Five Eyes) संस्थेच्या एका सदस्यानं यासंबंधीची माहिती दिल्याचंही अहवालात म्हटलंय. दरम्यान, अमेरिकेनेच ही माहिती दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. फाइव्ह आईज ही अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडची गुप्तचर संस्था आहे.
त्यांच्याकडे सिग्नल इंटेलिजन्स असल्याची बातमी कॅनडाच्या माध्यमांमध्ये आली होती. यामध्ये कॅनडामध्ये उपस्थित असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांच्या संवादाशी संबंधित पुरावे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, यामुळे या अधिकाऱ्यांवर हेरगिरी करण्यात आल्याचंही मानलं जात आहे. कदाचित त्यांचा मोबाईल, ईमेल किंवा लॅपटॉप हॅक झाला असावा अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. भारतानं कॅनडाचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले असून ते कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे म्हटलेय. यासोबतच कॅनडानं अद्याप कोणतेही पुरावे दिले नसल्याचे सांगण्यात आलेय.
ट्रूडो यांनीही याला केवळ आरोप म्हटले आहे. शुक्रवारी यूएनजीएमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो उपस्थित होते. आपण या गोष्टी अतिशय गंभीरपणे सांगितल्या असल्याचे ते यावेळी म्हणाले. फाइव्ह आईजच्या अहवालातील गुप्तचर माहिती प्रसारमाध्यमांसमोर आली आहे. कॅनडाच्या सरकारकडून याबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. दरम्यान, याबाबात प्रश्न विचारल्यावर कॅनडाच्या उपपंतप्रधान क्रिस्टीया फ्रिलँड यांनी यावर वक्तव्य करण्यास नकार दिला. त्यांनी ते थेड नाकारलं नाही किंवा थेट त्याचा स्वीकारही केला नाही.
चर्चा विश्वासावर
या चर्चा विश्वासावर केल्या जात असल्याचं पुरव्यांबाबत म्हणताना उपपंतप्रधानांनी सांगितलं. तर दुसरीकडे आपण काही आठवड्यांपूर्वीच दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येच्या आरोपांशी निगडीत पुरावे भारताला सोपवले असल्याचे ट्रुडो म्हणाले. आम्ही भारतासोबत रचनात्मक पद्धतीनं काम करण्यास तयार आहोत. या गंभीर प्रकरणाच्या मूळापर्यंत पोहोचण्यासाठी ते आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा आहे, असंही त्यांनी नमूद केलं