गोठवलेल्या गर्भावर नेमका हक्क कोणाचा?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 07:11 AM2021-04-09T07:11:18+5:302021-04-09T07:11:35+5:30
आधुनिक तंत्रज्ञानाने विवाहासंदर्भातले आणि मुलांसंदर्भातले झगडे, गुंतागुंत आणखी वाढवली आहे.
विवाहसंस्था ही खरं तर समाजातील एक भक्कम अशी संस्था, पण अलीकडे या संस्थेला जगभरातच तडे जाऊ लागले आहेत. विवाहांपेक्षा घटस्फोटांची संख्या वाढते आहे. जगभरात यावर चिंता व्यक्त केली जात आहे. त्यात आधुनिक तंत्रज्ञानाने विवाहासंदर्भातले आणि मुलांसंदर्भातले झगडे, गुंतागुंत आणखी वाढवली आहे.
घटस्फोटांच्या वाढत्या संख्येमुळे जगभरातील सरकारे आणि समाजचिंतक यावर उपाय शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. घटस्फोट घेताना जर त्या दाम्पत्याला मुलं नसतील, तर तशी फारशी चिंता नसते, पण मुलं असतील, तर मुख्य वाद असतो तो मुलांचा ताबा कोणाकडे जाईल याबाबतचा. बऱ्याचदा दोघाही पालकांना मुलांचा ताबा आपल्याकडे हवा असतो. अर्थात त्यालाही अपवाद आहेच. पुनर्विवाह करताना ज्या जोडीदाराकडे मुलं असतील, त्याला पुन्हा विवाह करताना अडचणी येतात, त्यामुळे घटस्फोट झाला, तरीही मुलाचा ताबा आपल्याकडे नको, असाही कल वाढतो आहे! पण विवाह आणि घटस्फोटांसंदर्भात अमेरिकेत आता एक नवाच प्रश्न उभा राहिला आहे. घटस्फोट तर झालाय किंवा घ्यायचाय, मूलही नैसर्गिकरित्या अजून जन्माला आलेलं नाही, तरीही या बाळाचा ताबा कोणाकडे जाईल, या बाळाला जन्माला घालायचं की नाही, यावरून वादविवाद सुरू आहेत.
अर्थात, हे वाद आधुनिक तंत्रज्ञानामुळे मुख्यत: निर्माण झाले आहेत. अमेरिकेत आजकाल मोठ्या प्रमाणात आयव्हीएफसारख्या आधुनिक तंत्रज्ञानानं मुलं जन्माला घालण्याचा प्रकार वाढतो आहे. स्त्री-पुरुषांची बीजं, गर्भ गोठवून ठेवले जाणे तंत्रज्ञानाने शक्य केले आहे. नंतर दाम्पत्याच्या प्राधान्यक्रमानुसार मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला जातो, पण वैचारिक मतभेदांमुळे लवकरच घटस्फोट होत असल्याने गोठवून ठेवलेल्या गर्भावर पत्नीचा अधिकार की पतीचा यावरून अमेरिकेत अनेक ठिकाणी कज्जे खटले चालू आहेत. मुख्यत: दोघांपैकी कोणा एकाला जर मूल नको असेल तर अधिक अडचणी येतात.
सार्वजनिक स्वरूपात पहिल्यांदा ही भांडणं चव्हाट्यावर आली, जेव्हा अभिनेत्री सोफिया वेर्गारा आणि तिचा पूर्व प्रियकर निक लोएब यांच्यात गोठवलेल्या गर्भावरून प्रकरण कोर्टात गेलं तेव्हा. निक लोएबला या गोठवलेल्या गर्भापासून मूल हवं होतं, तर सोफियाचा त्याला नकार होता. हा गाेठवलेला गर्भ तसाच ठेवावा, असं तिचं म्हणणं होतं. कारण, तोपर्यंत ते दोघंही विभक्त झाले होते आणि सोफिया नव्या प्रेम प्रकरणात गुंतलेली होती. त्यामुळे आपल्या जुन्या प्रियकरापासून तिला मूल नको होतं. कोर्टानंही २०१५ मध्ये निक लोएबच्या विरोधात निकाल दिला. कारण, २०१३ मध्ये त्यांनी जेव्हा कागदपत्रांवर सह्या केल्या होत्या, त्यावेळी दोघांच्या संमतीनं मूल जन्माला घातलं जाईल असं म्हटलं होतं. त्यामुळे निकचा दावा नाकारण्यात आला.
गोठवलेल्या गर्भावर कुणाचा अधिकार याबाबत कायदा आणि कागदपत्रांची अपूर्णता यामुळेही विभक्त झालेल्या दाम्पत्यांत मोठ्या प्रमाणावर वादविवाद होत आहेत. कारण, दाम्पत्याकडून ज्यावेळी गर्भ गोठवण्याचा निर्णय घेतला जातो, त्यावेळी बऱ्याचदा त्यातील कायदेशीर अडचणींचा विचारच केलेला नसतो. विभक्त झाल्यानंतर गोठवलेल्या गर्भावर दोघांपैकी कोणाचा अधिकार असेल, एखाद्या जोडीदाराचा मृत्यू झाला तर त्या गर्भाचं काय किंवा एखादा जोडीदार मानसिकदृष्ट्या असंतुलित झाला तर निर्णय कसा करायचा, याबाबत कागदपत्रांमध्ये पुरेशी स्प्ष्टता नसल्याने असे वाद निर्माण होतात.
यासंदर्भात अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीतील प्रसिद्ध वकील मोनिका मेजेजी यांचं म्हणणं आहे की, घटस्फोट झाल्यानंतर एखाद्या जोडीदाराला गोठवलेल्या गर्भापासून मूल हवं असेल, तर दुसऱ्या जोडीदाराची विचित्र अवस्था होते. लॉकडाऊनच्याच काळात अमेरिकेत आयव्हीएफ ट्रीटमेंटची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली.
एनवाययू लँगन फर्टिलिटी सेंटरचे डॉ. ब्रुक होड्स वर्टज यांचा सर्व दाम्पत्यांना एक महत्त्वाचा सल्ला आहे : ते सांगतात, भविष्यातील आपल्या नात्याबाबत जोडपी साशंक असोत किंवा नसोत, गर्भ गोठवून ठेवण्यासोबत त्यांनी शुक्राणू आणि स्त्री बीजंही गोठवून ठेवली पाहिजेत. कायदेशीर दस्तावेजांमध्ये मुलांच्या अधिकारांबाबतच्या सर्व गोष्टी स्पष्टपणे नमूद केल्या पाहिजेत. कागदपत्रं जर क्लिअर नसतील, तर कोर्टही तुम्हाला मदत करू शकणार नाही.
एकाच केंद्रात १३ लाख गर्भ जतन
फर्टिलटी ट्रीटमेंटची संख्या अमेरिकेत दरवर्षी वाढतेच आहे. अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतील लँगन फर्टिलिटी सेंटरमध्ये २०१९ च्या तुलनेत जून ते डिसेंबर २०२० या केवळ सहा-सात महिन्यांच्या काळातच या उपचारांची संख्या ३० टक्क्यांनी वाढली. सिएटल रिप्रॉडक्टिव्ह मेडिसिन सेंटरमध्ये या ट्रिटमेंटमध्ये १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नॉक्सविले येथील सर्वात मोठ्या गर्भदान केंद्रात सध्या १३ लाख गर्भ जतन करून ठेवण्यात आले आहेत. गेल्या दशकापेक्षा या एकाच केंद्रात ही संख्या तब्बल सहा लाखांपेक्षाही अधिक वाढली आहे.