Anita Anand : कोण आहेत अनिता आनंद? ज्या होऊ शकतात कॅनडाच्या पुढील पंतप्रधान, भारताशी आहे खास नातं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 09:20 IST2025-01-07T09:17:21+5:302025-01-07T09:20:55+5:30
Anita Anand : कॅनडाच्या पुढील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अनिता आनंद, पियरे पॉलीव्रे, क्रिस्टिया फ्रीलँड आणि मार्क कार्नी यांसारखी प्रमुख नावे पुढे येत आहेत.

Anita Anand : कोण आहेत अनिता आनंद? ज्या होऊ शकतात कॅनडाच्या पुढील पंतप्रधान, भारताशी आहे खास नातं
Justin Trudeau Resignations: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या पदाचा सोमवारी (६ जानेवारी)राजीनामा दिला. सरकारवर आणि वैयक्तिक पातळीवर झालेल्या टीकेमुळे हा निर्णय घेतल्याचे जस्टिन ट्रुडो यांनी सांगितले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता त्यांचा उत्तराधिकारी कोण होणार? अशी चर्चा सुरू झाली आहे.
कॅनडाच्या पुढील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अनिता आनंद, पियरे पॉलीव्रे, क्रिस्टिया फ्रीलँड आणि मार्क कार्नी यांसारखी प्रमुख नावे पुढे येत आहेत. यापैकी भारतीय वंशाच्या नेत्या अनिता आनंद त्यांच्या प्रभावी कारभारामुळे आणि सार्वजनिक सेवेच्या चांगल्या रेकॉर्डमुळे प्रबळ दावेदार मानल्या जातात.
अनिता आनंद या कॅनडाच्या पंतप्रधान झाल्या, तर जस्टिन ट्रूडो यांच्या काळात कॅनडा आणि भारत यांच्यात बिघडलेले संबंध पुन्हा चांगले होतील, अशी अपेक्षा केली जाऊ शकते. दरम्यान, कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. या कारणास्तव भारतीय वंशाची व्यक्ती पंतप्रधान होणे भारतासाठी चांगले संकेत देऊ शकते.
याआधी जस्टिन ट्रूडो यांच्या कारकिर्दीत भारतावर हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येचा खोटा आरोप करण्यात आला, त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. कॅनडाच्या सरकारने या संदर्भात कोणताही ठोस पुरावा सादर केला नाही. याचा परिणाम असा झाला की, पक्षातील इतर नेत्यांशी जस्टिन ट्रुडोचे संबंध बिघडले. अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
अनिता आनंद परिवहन आणि गृहमंत्री
जस्टिन ट्रुडो यांची जागा घेणाऱ्या पहिल्या पाच उमेदवारांमध्ये भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांचे नाव बीबीसीद्वारे दाखवण्यात आले आहे. ५७ वर्षीय अनिता आनंद सध्या देशाच्या परिवहन आणि गृहमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या शैक्षणिक आणि राजकीय पार्श्वभूमीमुळे त्या एक महत्त्वाची राजकीय व्यक्ती म्हणून उदयास आल्या आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्या टोरंटो विद्यापीठात कायद्याच्या प्राध्यापक होत्या.
अनिता आनंद यांची कौटुंबिक पार्श्वभूमी
अनिता आनंद यांचा जन्म नोव्हा स्कॉशियाच्या केंटविले येथे झाला. त्यांचे आई-वडील सरोज डी. राम आणि एस.व्ही. (अँडी) आनंद, हे दोघेही भारतीय चिकित्सक होते. त्यांच्या दोन बहिणी गीता आणि सोनिया आनंद याही आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत. अनिता आनंद यांनी २०१९ मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि तेव्हापासून त्या लिबरल पक्षाच्या सर्वात महत्त्वाकांक्षी सदस्यांपैकी एक बनल्या आहेत.